Pune Crime News | ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावुन नेणार्‍या चोरट्यास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने केले जेरबंद

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime News | कोथरुडमधील मयुर कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेणार्‍या तिघा चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाला यश आले आहे.

विश्वजीत रामचंद्र मोरे Vishwajit Ramchandra More (वय २०, रा. इनामदार चाळ, गोंधळेनगर, हडपसर) असे या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत कोथरुडमधील गुजराथ कॉलनीत राहणार्‍या ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ते १५ मार्च २०२६ रोजी सकाळी सव्वा सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी मयुर कॉलनीमध्ये चालत जात होते. गल्ली नंबर २ समोरुन पायी जात असताना एकाने त्यांना विचारले, हा रस्ता पुढे कोठे जातो. ते काही बोलणार, त्या आधीच या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाची सोनसाखळी तोडून पुढे मोटारसायकलवर बसलेल्या दोघांमध्ये बसून ते पळून गेले. कोथरुड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे शहरातील ११० ते १४० सीसीटीव्ही फुटेज चेक करुन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती प्राप्त केली. त्यामधील संशयित आरोपींचे फोटो बातमीदारांपर्यंत पोहचविले होते. पोलीस अंमलदार बाळु गायकवाड व रवींद्र लोखंडे यांना त्यांच्या बातमीदारांनी सांगितले की, चैन चोरी करणारा आरोपी ताडीवाला रोडवरील आर पी एफ डॉग ट्रेंनिग सेंटर बॅरेक येथे काळ्या रंगाच्या मोटारसायकलसह थांबलेला आहे. पोलीस पथक तातडीने तेथे रवाना झाले. त्यांनी विश्वजीत मोरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने ओमकार राजेश बनसोडे (वय २३, रा. गोपाळपट्टी चौक, मांजरी रोड, हडपसर) व एका साथीदाराच्या मदतीने चैन चोरी केल्याची कबुली दिली. ओमकार बनसोडे याला हिंजवडी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून सध्या तो कारागृहात आहे. त्याने वापरलेली मोटारसायकल व आरोपीला पुढील तपासासाठी कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, रवींद्र लोखंडे, प्रदिप राठोड, धनजय ताजणे, साईकुमार कारके, अमित गद्रे, महेश पाटील, दत्तात्रय पवार, अजित शिंदे, साधना पवार, विद्या पर्‍हाड यांनी केली आहे.

You may have missed