Pune Crime News | नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात केली चोरी; फुरसुंगी पोलिसांनी सव्वा सहा लाखांच्या दागिन्यासह गुन्हेगाराला केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजार्याचे घर फोडून सोन्याचे दागिने चोरुन नेणार्या चोरट्याला फुरसुंगी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ६ लाख ४१ हजार रुपयांचे ५ तोळ्याचे दागिने जप्त केले आहेत.
राहुल उत्तम पठारे Rahul Uttam Pathare (वय ३९, रा. होळकरवाडी, ता़ हवेली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत अभिजिति मधुकर पठारे (रा. होळकरवाडी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते मित्राच्या लग्नाला गेले असताना २६ नोव्हेंबर रोजी दिवसभरात त्यांच्या घराच्या टेरेसच्या दरवाजा उघडून त्यातून आत प्रवेश करुन बेडरुममधील कपाटाचे लॉकर तोडून चोरी करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस हवालदार सागर वणवे व पोलीस अंमलदार अभिजित टिळेकर यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, राहुल पठारे याने ही चोरी केली असून त्यातील काही सोने महंमदवाडी येथील एका ज्वेलर्समध्ये विक्री केली आहे.
या बातमीनुसार पोलिसांनी राहुल पठारे याला घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याने सांगितले की त्याला नर्तकी सोबतचे बैठकीचा व नाच गाण्याचा शौक असल्याने त्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी जवळ पैसे नसल्याने त्याने चोरी केली आहे. फिर्यादी अभिजित पठारे यांच्या पाठीमागेच राहुल पठारे रहात असून त्यांच्या दोघांच्या टेरेसमध्ये थोडेच अंतर आहे. त्यांचे घर बंद पाहून तो त्यांच्या घराच्या टेरेसवरुन अभिजित पठारे यांच्या टेरेसवर आला. तेथून आत प्रवेश करुन चोरी केली होती. चोरी केलेल्या पैकी काही सोने महंमदवाडी येथील एका सोनाराला विक्री केल्याचे व त्यापोटी आलेली ३० हजार रुपयांची रक्कम खर्च केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने विकलेले सोने व उर्वरित सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख १४ हजार रुपयांचे ५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ़ राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख, महेश नलवडे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, हरीदास कदम, सतीश काळे, पोलीस अंमलदार अभिजित टिळेकर, बिभिषण कुंटेवाड, वैभव भोसले यांनी केली आहे़
