Pune Crime News | सोशल मीडियावरील प्रेमातून त्यांनी केला निकाह; वर्षभरातच मुलाने उंदीर मारण्याचे औषध पिऊन उचलले टोकाचे पाऊल, आंबेगाव पोलिसांनी विवाहितेसह 5 जणांना केली अटक
पुणे : Pune Crime News | सोशल मीडियावर त्यांचे प्रेम फुलले़ त्यांनी निकाह केला. पण, पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून मुलाने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आपले जीवन संपविले. आंबेगाव पोलिसांनी विवाहितेसह ५ जणांना अटक केली आहे.
मोहम्मद साद (साद) आसीफ सय्यद (वय २०) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत नौशा दत्तन्वीर अहमद (वय ४१, रा. मालेगाव, जि. नाशिक) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी करीमुन्निशा ऊर्फ निशा खान (वय २०, रा. जांभुळवाडी), सर्वर ऊर्फ कैफ कमरुखान (वय २२, रा. संतोषनगर, कात्रज), रेश्मा कमरु खान (वय ५०), शमा जावेद शेख आणि जावेद शेख (वय २५, सर्व रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार कात्रजमधील संतोषनगर येथे रिक्षामध्ये १२ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद याची करीमुन्निशा हिच्याबरोबर सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी गेल्या वर्षी विवाह केला. त्यानंतर मोहम्मद पुण्यात येऊन रिक्षा चालवत होता. पत्नी व तिच्या माहेरचे लोक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून मोहम्मद सय्यद याने १२ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता रिक्षामध्येच उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना १८ मार्च रोजी त्याचा मृत्यु झाला. आंबेगाव पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल करुन ५ जणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.
