Pune Crime News | जंगली महाराज मंदिरासमोर भर दुपारी ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरट्याने हिसकावले

पुणे : Pune Crime News | अत्यंत वर्दळीचा रोड म्हणून गणल्या जाणार्या जे एम रोडवरील जंगली महाराज मंदिरासमोर ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील २ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेण्यात आल्याची घटना घडली. महिलेचे दागिने हिसकावून दुचाकीस्वार चोरटा पसार झाला.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला सहकारनगर भागात राहायला आहेत. श्री जंगली महाराज मंदिरात वार्षिक उत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला एका भजनी मंडळात आहेत. बुधवारी (९ एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास त्या भजन करण्यासाठी मंदिरात गेल्या होत्या. श्री जंगली महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २ लाख ४० हजारांचे दागिने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटा वेगात पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग विभागाचे सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी जंगली महाराज रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्याचे केलेले चित्रीकरण तपासले आहे. त्यावरुन चोरट्याचा शोध घेतला जात आहे़ पोलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करत आहेत.