Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून युवकाचा खुन करणार्‍या तिघांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने 4 तासात घेतले ताब्यात

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून युवकाच्या डोक्यात, मानेवर, पाठीवर सपासप वार करुन त्याचा निर्घुण खुन करणार्‍या तिघा अल्पवयीन मुलांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने अवघ्या ४ तासात ताब्यात घेतले.

करण गिरीश काशिद (वय १९, रा. सनराईज अव्हेन्यू, धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे.

करण काशिद हा आनंदनगर येथील अरविंद सोसायटीमधील सार्थक बंगला येथे १६ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता मित्रांबरोबर बोलत होता. त्यावेळी तिघे जण तेथे आले. त्यांनी तीक्ष्ण हत्याराने करण याच्या डोक्यात, पाठीवर, मानेवर सपासप वार करुन त्याचा खुन केला. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार तपासणी करत होते. त्यावेळी तीन संशयितांचे चेहरे दिसल्याने ते फोटो ओळखीच्या सर्व बातमीदारांना पाठविले. पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, या फोटोतील तीन संशयित कर्वेनगर येथील वनदेवी उद्यान येथे थांबलेले आहेत. त्यांनी काही तरी गैरकृत्य केल्याचे त्यांची हालचाली व बोलण्यावरुन वाटत आहे. ही खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर तेथे जाऊन पाहणी केल्यावर पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्यांचा रात्री ताब्यात घेतले. त्यांनी पूर्ववैमनस्यातून करण काशीद यांना मारल्याची कबुली दिली. अधिक तपासासाठी त्यांना सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके व पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अजित शिंदे, प्रदिप राठोड, साधना पवार, रेहाना शेख, साईकुमार कारके, अमित गद्रे, महेश पाटील, रवींद्र लोखंडे, बाळु गायकवाड, शिवाजी सातपुते, विद्या पर्‍हाड यांनी केली आहे़

You may have missed