Pune Crime News | वाहतूक नियमभंगाची एपीके फाईल पाठवून पावणेतीन लाखांची फसवणूक
पुणे : Pune Crime News | वाहतूक नियमभंगाची एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी एकाची पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत सदाशिव पेठेतील एका ५७ वर्षाच्या नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ ते १९ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर आर टी ओ ची वाहतूक नियमभंगाची एपीके फाईल पाठविली होती. चोरट्यांनी पाठविलेली एपीके फाईल उघडताच फिर्यादीचा मोबाइल क्रमांक सायबर चोरट्यांनी हॅक करुन बँक खात्यातून पावणेतीन लाख रुपयांची रोकड लांबविली. खात्यातून पैसे काढून ते दुसर्या खात्यात हस्तांतरित झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.
वाहतूक नियमभंग, थकीत वीज देयक, गॅस देयकाची एपीके फाईल पाठवून गेल्या काही महिन्यांपासून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन पाठविण्यात आलेली एपीके फाईल उघडू नये. खातरजमा करुन सर्व व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसंकडून करण्यात आले आहेत.
