Pune Crime News | गुंतवणुकदारांना अडीच कोटींना गंडा घालून शारजाला पळून गेलेल्या दोघा संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने हैदराबाद एअरपोर्टवर केले अटक
पुणे : Pune Crime News | दरमहा ६ ते ८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुक करायला लावून गुंतवणुकदारांची २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणुक करणार्या ट्रेडस इन्वेस्टमेंट व इन्फीनाईट बेकॉन इंडिया या कंपनीच्या दोघा संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने शारजाहून भारतात आल्यावर हैदराबाद विमानतळावर बेड्या घातल्या.
सचीन लक्ष्मण खडतरे Sachin Laxman Khadtare (वय ३८, रा. खडतरे वस्ती, करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) आणि प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी Prasad Prakashrao Kulkarni (वय ३६, रा. सारंग सोसायटी, नांदेड सिटी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
इन्फीनाईट बेकॉन इंडिया प्रा. लि. व ट्रेडस इन्वेस्टमेंट प्रा.लि. या कंपनीचे संचालक नवनाथ जनन्नाथ अवताडे, अगस्त राहुल मिश्रा, राहुल श्यामराव काळोखे, सचीन लक्ष्मण खडतरे, चेतन धर, प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी, यातील राहुल मिश्रा, गौरव देवीदास सुखदेव व इतरांनी शेअर मार्केटमध्ये काम करीत असल्याचे सांगितले. आमच्याकडे गुंतवणुक केल्यास महिन्याला ६ ते ८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. लोकांकडून पैसे स्वीकारुन ट्रेडस या ऑनलाइन पोर्टलवर खोटा परतावा दाखविला. मात्र मुळ रक्कम व परतावा विड्रॉवल रिक्वेस्ट पाठविल्यास कोणताही परतावा न देता २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणुक केली होती. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता.
आरोपींचा शोध घेतला असता ते मिळून येत नव्हते. आरोपी हे परदेशी पळून गेल्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरोधामध्ये लुक आऊट नोटीस काढण्यात आली होती. सचिन खडतरे व प्रसाद कुलकर्णी हे ३० डिसेंबर रोजी शारजा ते हैदराबाद विमानाने हैदराबाद येथे आले. ते हैदराबाद विमानतळावर आल्याची माहिती इमिग्रेशन विभागाने पोलिसांना दिली. त्याबरोबर सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, सहायक पोलीस फौजदार राजेश लांघी, विनोद चव्हाण व मुसळे हे हैदराबाद येथील राजीव गांधी एअर पोर्टला पोहचले़ त्यांनी दोघांना अटक केली.
इन्फीनाईट बेकॉन इंडिया प्रा. लि. व ट्रेडस इन्वेस्टमेंट प्रा. लि. या कंपनीकडून कोणाची फसवणुक झाली असल्यास संबंधिताने कागदपत्रे व पुराव्यांसह आर्थिक गुन्हे शाखेची संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शुभदा संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, सहायक पोलीस फौजदार राजेश लांघी, पोलीस अंमलदार स्वाती खंडाळे, लता गव्हाणे यांनी केली आहे.
