Pune Crime News | दोघा वृद्ध नागरिकांची सव्वातीन कोटींची फसवणूक; मनी लॉड्रिंगची केस असल्याचा बहाणा करुन अटकेची भिती दाखवून रक्कम पाठविण्यास पाडले भाग
पुणे : Pune Crime News | तुमच्या आधार कार्डचा वापर करुन बनावट बँक खाते काढून त्याद्वारे मनी लॉड्रिंग झाले असल्याचे सांगून दोघा वृद्ध गृहस्थांना अटकेची भिती दाखवून त्यांना सव्वा तीन कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरण्यास सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत एरंडवणे येथील ७० वर्षाच्या वृद्ध गृहस्थाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान घडला. त्यांना राहुल रॉय पसर्नल डेटा प्रोटेक्शन ऑफ इंडिया अंधेरी वेस्ट येथून बोलत असल्याचे फोन करणार्याने सांगितले. त्यांचा आधार कार्डाचा वापर करुन मोबाईल अश्लिल व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पाठवले जात आहे, अशी तक्रार दाखल आहे असे त्यांना सांगितले.
पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया या संघटनेच्या संपर्कात असून त्यांच्या मोबाईलनंबर वरुन दीड कोटी रुपयांचा फ्रॉड झाला आहे, असे सांगण्यात आले. ही बाब कोणाला सांगायची नाही, ही सुप्रीम कोर्टाची केस आहे, असे धमकावुन फिर्यादी व त्यांच्या पत्नीला प्रेशरमध्ये ठेवले. त्यांना वारंवार प्रेशर करुन त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २ कोटी १ लाख ९० हजार २४७ रुपये भरायला भाग पाडून त्यांची फसवणूक केली. सायबर चोरट्यांच्या धमक्यांमुळे दोघे पतीपत्नी इतके घाबरले होते की, पुण्यात असलेली आपली मुलगी व जावयालाही त्यांनी गोष्ट सांगितली नाही. पोलीस निरीक्षक देवकाते अधिक तपास करीत आहेत.
वानवडी येथील एका ८६ वर्षाच्या वृद्ध गृहस्थाने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना १९ डिसेंबर २०२५ रोजी व्हॉटसअॅप कॉल आला होता. त्यात पोलीस गणवेशातील एस लक्ष्मण व प्रदीप सावंत यांनी मुंबई पोलीस असल्याचे भासवले. कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये मनी लॉड्रिंगची केस असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या नावावर कॅनरा बँकेत अकाउंट असल्याचे सांगितले. त्याचा वापर मनी लॉड्रिंगसाठी झाल्याचे सांगून या प्रकरणात अटक करण्याची भिती दाखविली. फिर्यादी यांच्या सर्व बँक खात्याची माहिती घेऊन त्यातील रक्कमा त्यांचेकडे पडताळणी करीता जमा करण्याबाबत फिर्यादी यांच्यावर दबाब टाकून वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण १ कोटी २७ लाख ५३ हजार रुपये भरावयास सांगून त्यांची फसवणूक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.
