Pune Crime News | रास्ता पेठेत लुटमार करणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने केली अटक; दोन गुन्हे उघडकीस

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  रास्ता पेठेत एकाला धमकावुन त्याच्याकडील ३० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटून नेणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली़ त्यांच्याकडून २ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

अस्लम इस्माइल शेख उर्फ बिल्ला Aslam Ismail Shaikh alias Billa (वय २२), रेहान जमील शेख उर्फ रिहान Rehan Jameel Shaikh alias Rihan (वय १९, दोघे रा. म्हाडा वसाहत, ससाणेनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

रास्ता पेठेतील शांताई हॉटेल चौकात आठवडाभरापूर्वी आरोपी शेख यांनी एकाला अडवून त्याच्याकडील ३० हजारांची रोकड लुटली होती. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार हेमंत पेरणे व पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना त्यांच्या बातमीदारांनी बातमी दिली की, जबरी चोरीच्या रेकॉर्डवरील आरोपी अस्लम ऊर्फ बिल्ला व रेहान शेख यांनी मिळून शहरात बर्‍याच ठिकाणी त्याचे इतर साथीदारांसह जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत. या बातमीची खात्री करुन पोलीस त्यांच्या घरी गेले असता ते घरी मिळाले़ दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी रास्ता पेठेत शांताई हॉटेल येथील चौकाजवळ एकाच्या खिशातून ३० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते.

तसेच लष्कर भागातील सरबतवाला चौकात एकाला लुटल्याची अस्लम शेख याने कबुली दिली. आरोपी अस्लम शेख सराईत असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात २१ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार निलेश साबळे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, मयूर भोसले, उमेश मठपती, ज्योती मुल्का यांनी केली आहे.