Pune Crime News | MBBS ला अॅडमिशन देण्याच्या बहाण्याने सव्वा कोटींचा गंडा घालून दोघे पार्टनर कार्यालय बंद करुन झाले पसार; १३ जणांची फसवणुक
पुणे : Pune Crime News | सोशल मीडियावर जाहिरात करायची, मोठ्या व्यावसायिक इमारतीत कार्यालय थाटायचे, काही तरुणींना कामावर ठेवायचे, लोकांना वेगवेगळ्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून अॅडमिशन करुन देतो, अशा भुलथापा लावायच्या़ लोकांकडून पैसे, चेक, आरटीजीएसद्वारे घ्यायचे, जेणे करुन सर्वांना खरे वाटावे, त्यानंतर एके दिवशी अचानक कार्यालय बंद करुन फरार व्हायचे, अशी नवी मोडस शिक्षण क्षेत्रात शिरली आहे. गेल्या काही महिन्यातील तिसरा प्रकार समोर आला आहे.
बालेवाडी येथे कार्यालय थाटून जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज तसेच राज्यातील वेगवेगळ्या एमबीबीएसला अॅडमिशन करुन देण्याचे आमिष दाखवून दोघा भामट्यांनी १३ जणांना तब्बल १ कोटी २६ लाख २८ हजार रुपयांना गंडा घालून फसवणुक केली आहे. त्यांच्या कार्यालयात कामाला असलेल्या ७ तरुणींनाही त्यांनी एक महिन्याचा पगार न देता काम करवुन घेतले आहे.
याबाबत चंद्रपूर येथील सीसीटीव्हीचे व्यवसायिक यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राजेश गुप्ता आणि ब्रिजेश आर्या यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ नोव्हेबर २०२५ ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला.
फिर्यादी यांच्या पत्नीने फेसबुक वर एमबीबीएसला पदवीधर शिक्षणाकरीता प्रवेशाबाबत जाहिरात पाहिली होती. त्यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश हवा होता. त्यांनी संपर्क केल्यावर सेजल नाचणे याने फोनवर सांगितले की, राजेश गुप्ता हे सर्व माहिती देतील. त्यानंतर त्यांनी पुण्यातील बाणेर येथील इग्नाईट एड व्हेंचर्स इटर्निटी येथील कार्यालयात यावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार ते, मुलीला घेऊन बाणेर फाटा येथील कार्यालयात १० नोव्हेंबर रोजी भेटले.
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये प्रवेश करुन देतो, असे सांगितले. डोनेशनकरीता ३५ लाख रुपये लागतील, असे सांगितले. तुम्हाला हप्तेवारी पेमेंटची सुविधा करुन देतो, असे सांगितले. तेव्हा त्यांनी टोकन म्हणून ३ लाख रुपयांचा धनादेश दिला. त्यावेळी ब्रिजेश आर्या व राजेश गुप्ता यांनी त्यांचे लेटरहेटवर क्लांईट अॅग्रीमेंट करुन त्यावर सर्व तपशील लिहून पत्र दिले. जळगाव येथे येताना ७ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. ६ डिसेंबर रोजी या दोघांनी त्यांना प्रवेश घेण्यासाठी जळगावला बोलावले. ते ज्या हॉटेलवर उतरले होते, तेथे ते दोघे आले. त्यांनी कॉलेजचा अॅडमिशन फार्म आणला व तो भरुन घेतला.
त्यांच्या मुलीचा फोटो त्यावर लावला. त्यांच्याकडून मुळ कागदपत्रे व वार्षिक फीचा ६ लाख २७ हजार ८०३ रुपयांचा डी डी घेऊन सकाळी १० वाजता कॉलेजला या आम्ही तेथेच तुमची वाट पाहीन, असे सांगितले. ७ डिसेंबर रोजी ते कॉलेजला गेले. परंतु, या दोघांचे मोबाईल बंद लागत होते. बराच वेळ प्रयत्न करुनही त्यांचे फोन न लागल्याने आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते पुण्यातील कार्यालयात आले तर कार्यालय बंद करुन त्यांनी पळ काढला असल्याचे दिसून आले. कार्यालयात काम करणार्या तरुणींचा एक महिन्यांचा पगारही त्यांनी दिलेला नाही
सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण यांनी सांगितले की, राजेश गुप्ता आणि ब्रिजेश आर्या यांनी १३ जणांची १ कोटी २६ लाख २८ हजार रुपयांची फसवणुक केल्याच्या तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी बालेवाडीमध्ये कार्यालय सुरु केले होते. ६ डिसेंबर रोजी कार्यालय बंद करुन ते पळून गेले आहेत. फसवणुक करणार्यांची संख्या आणखी वाढू शकते.
