Pune Crime News | बनावट सोन्याची बिस्कीटे खरे असल्याचे भासवुन फसवणुक करणार्या दोघा चोरट्यांना केले जेरबंद; वयोवृद्ध महिलांना जेवण वाटप करीत असल्याचे सांगून सोन्याचे दागिने पळविले होते
पुणे : Pune Crime News | वयस्कर महिलेला जेवण वाटप करीत असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवायला सांगून हातचलाखी करुन लांबविणार्या चोरट्यांना खंडणी विरोधी पथकाने पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात दोन हुबेहुब बनावट सोन्याची बिस्किटे आढळून आली. त्यातुन कराड सिटीमधील एक गुन्हा उघडकीस आला आहे.
दिलीप विश्वनाथ स्वामी ऊर्फ जाधव Dilip Vishwanath Swami alias Jadhav (वय ५२, रा. जळकोट, जि. लातूर) आणि अमोल बाबु गिरी Amol Babu Giri (वय ५३, रा. अहमदपूर, जि. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दिलीप स्वामी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध लातूरमध्ये अॅट्रोसिटीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले हे हडपसर येथील भाजी मंडई येथे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. रेकॉर्डवरील आरोपी दिलीप स्वाती त्याच्या साथीदारासह साधन विद्यालयाकडे जाणार्या कॅनॉल रोडवर चोरी करण्याच्या तयारीत आहे. वरिष्ठ अधिकार्यांना सांगून पोलीस पथकाने तेथे जाऊन दिलीप स्वामी व अमोल गिरी यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी २४ जुलै २०२५ रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता प्रेमळ विठ्ठल मंदिर फुटपाथजवळ एका वयस्कर महिलेस जेवण वाटप सुरु असल्याचे सांगितले. तेथे गर्दी असल्याने तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवा, असे सांगून हातचलाखीने पिशवी चोरुन नेली होती. हा गुन्हा फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल होता.
त्यांची झडती घेतली असता त्याचे खिशात दोन हुबेहुब बनावट सोन्यासारखी दिसणारी पिवळ्या धातुची बिस्कीटे व एक बेनटेक्सची चैन मिळुन आली. या दोघांनी एर्टिगा गाडीमधून प्रवास करुन कराड येथे वयोवृद्ध महिलेला बनावट सोन्याची बिस्कीटे दाखवुन तिच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र काढून घेतले होते. कराड सिटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे़ या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर अपहरण, अॅट्रोसिटी व फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, चेतन आपटे, विनोद महाजन, गणेश खरात व आझाद पाटील यांनी केली आहे.
