Pune Crime News | मैत्रिण भाड्याचे घर सोडून गेल्याने दोघा लहान भावाने मोठ्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण करुन केले जखमी, वडगाव शेरीमधील घटना
पुणे : Pune Crime News | तुझ्यामुळे माझी मैत्रिण तिचे भाड्याचे घर सोडून निघून गेली, असे म्हणून दोघा लहान भावांनी मोठ्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले.
याबाबत सुमित सुशिल बोरगे (वय ३५, रा. माळवाडी, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांचे भाऊ
अमित सुशिल बोरगे (वय ३३) आणि अक्षय सुशिल बोरगे (वय ३१, दोघे रा. माळवाडी, वडगाव शेरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार माळवाडी येथील घरी व सत्यम सुरेनिटी सोसायटीसमोर १० डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित बोरगे हे पत्नी व लहान मुलासह राहत असून ते सध्या काहीच काम करीत नाही. १० डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास ते घरासमोर असताना त्यांचा भाऊ अक्षय बोरगे हा जवळ आला. तो म्हणाला की, ‘‘तुझ्यामुळे माझी मैत्रिण तिचे भाड्याचे घर सोडून निघून गेली़’’ असे म्हणून तो शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन लागला. ही भांडणे त्यांची पत्नी कल्याणी यांनी सोडविल्यानंतर अक्षय हा तेथून निघून गेला होता. त्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता ते सत्यम सुरेनिटी सोसायटीसमोर उभे असताना दुचाकीवरुन त्यांचे भाऊ अमित व अक्षय बोरगे हे आले. त्यांनी शिवीगाळ करुन अक्षय याने लोखंडी रॉडने नाकावर मारले. त्यामुळे नाकातून रक्त येऊ लागल्याने ते खाली बसले. तेव्हा त्यांनी लाकडी दांडक्याने पाठीवर, हातावर बेदम मारहाण करुन जखमी केले. ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस हवालदार अहिवळे तपास करीत आहेत.
