Pune Crime News | रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने दोघा तरुणांची 14 लाखांची फसवणुक
पुणे : Pune Crime News | रेल्वेमध्ये पत्नी व भावाला नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून १४ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी जळगावमधील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत येरवड्यातील रामनगरमधील एका ३७ वर्षाच्या तरुणाने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यावरुन पोलिसांनी सागर दिगंबर पाटील Sagar Digambar Patil (वय ३५), स्वप्नील मुरलीधर गायकवाड Swapnil Muralidhar Gaikwad (वय ३३, दोघे रा. तळई, ता. एरंडोल. जि. जळगाव ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार २३ ऑगस्ट २०२३ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान येरवड्यातील रामनगर येथे घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपींशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. फिर्यादींची पत्नी आणि भावाला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. त्यानंतर आरोपींनी तरुणाकडून वेळोवेळी १९ लाख १५ हजार रुपये घेतले. नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. दिनेश राठोड यांनी पैशांची मागणी केल्यावर आरोपींनी त्यांना ५ लाख रुपये परत केले. उर्वरित पैसे देतो, असे सांगितले. उर्वरित पैसे देण्यास आरोपींनी टाळाटाळ केली. त्यानंतर तरुणाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत तपास करत आहेत.
