Pune Crime News | कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर अदखलपात्र गुन्हा ! खोटा पुरावा तयार करुन पोलिसांची केली दिशाभूल, फोटो एडिट स्वत:च लिहला मजकूर, न्यायालयाच्या परवानगीने होणार तपास

पुणे: Pune Crime News | कुरिअर बॉय म्हणून घरी आलेल्या तरुणाने स्प्रे मारुन बेशुद्ध करुन आपल्यावर अत्याचार केल्याचा तरुणीने आरोप केल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात हा सर्व बनाव या तरुणीनेच घडवून आणला होता. तो तिचा मित्र असून एक वर्षांपासून ते एकमेकांना ओळख होते. तो गेल्यानंतर या तरुणीने त्याच्याबरोबर काढलेला फोटो एडिट करुन त्यावर “पुन्हा येईन” असे लिहिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोंढवा पोलिसांनी या तरुणीवर खोटा पुरावा तयार करुन पोलीस अधिकार्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तिने हा सर्व प्रकार का केला, हे मात्र ती काही सांगत नाही. न्यायालयाच्या परवानगी या गुन्ह्याचा तपास करुन तिने हा सर्व प्रकार का केला याचा शोध घेतला जाणार आहे.
कोंढव्यात २ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडल्याचा या तरुणीने दावा केला होता. त्यानुसार सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी आला. त्याने फिर्यादीला तुमचे कुरिअर आले आहे. माझ्याकडे पेन नाही़ पेन आणता का असे म्हणाला. मी पेन आणायला वळल्यावर तो मागे आला व त्यानंतर फिर्यादी यांना काहीच कळले नाही. त्यानंतर तिला रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी जाग आली. तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. तिने मोबाईल अनलॉक करुन पाहिला असता मोबाईलच्या स्क्रिनवर कुरिअर घेऊन आलेल्या इसमासोबतचा अर्धनग्न अवस्थेतील फोटो दिसला. त्या फोटोवर “आज तो मजा आया, असे अनेक फोटो काढले आहे. हे कोणाला सांगितले तर सर्व फोटो लिक करेन, पुन्हा येईन तयार रहा,” असे लिहिले होते. मोबाईलमध्ये दोन फोटो दिसत होते. तिच्या सांगण्यावरुन पोलिसांनी ३ जुलै ला गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तपास करताना तिच्या मोबाईलमधील मेसेज तपासणी करुन पाहता फिर्यादी व आरोपीच्या मोबाईलमध्ये फिर्यादीने आरोपीस घरी येण्यास सहमती दिली आहे. १ जुलै रोजी केलेल्या व्हॉटसअॅप चॅटप्रमाणे फिर्यादीने आरोपीस घरी कोणी नसताना एक्स्ट्रा कपडे घेऊन येण्याबाबत सुचविले आहे. तसेच येण्याच्या मार्गाबाबत पूर्वीप्रमाणेच ये असे सुचविले आहे. त्यावरुन आरोपी हा कुरियर बॉय नसून तो फिर्यादीचा मित्र असल्याचे निष्पन्न झाले. दोघे एकमेकांचे एक वर्षांपासून मित्र असल्याचे तपासादरम्यान समोर आलेले आहे.
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनाही तिने आपल्या तोंडावर स्प्रे मारल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी हिने घटना घडल्यानंतर रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी शुद्धीवर आल्यावर स्वत:चा फोन हातात घेऊन पाहिला असे तक्रारीत नमूद केले.
प्रत्यक्षात अर्धनग्न अवस्थेतील फोटो आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलवरुन तिच्या संमतीने २ जुलै ला रात्री १९ वाजून ५३ मिनिटांनी काढलेले होते़ व आरोपी हा सोसायटीचे लिफ्टमधून ग्राऊंड फ्लोअरला येऊन मेनगेटमधून २० वाजून २७ मिनिटांनी बाहेर पडल्याचे स्पष्ठ झाले आहे. परंतु फिर्यादीचे फोन वरुन काढण्यात आलेला फोटो हा २० वाजून २७ मिनिटे व ५३ सेंकदांनी एडिट करुन त्यावर मेसेज टाईप केलेला आहे. हा मेसेज फिर्यादी हिने स्वत:च टाईप केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
फिर्यादीच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर केला असता त्यामध्ये फिर्यादीने आरोपी सोबतचा काढलेला मुळ फोटो ज्यामध्ये दोघांचाही चेहरा स्पष्ट दिसत आहे. तो मिळून आला आहे़ असा फोटो फिर्यादीने स्वत: क्रॉप व एडिट करुन त्यात आरोपीचा चेहरा दिसू नये, त्याद्वारे तपासामध्ये संदिग्धता निर्माण व्हावी, म्हणून त्यात फेरबदल करुन मोबाईलवर ठेवला आहे. तिने तिचा मोबाईल पोलिसांना तपासासाठी देण्याचे पूर्वी मुळ फोटो डिलिट केले आहेत. आरोपीची ओळख पटू नये, म्हणून स्वत:च्या मोबाईलमध्ये फोटो एडिट करुन ठेवले. मुळ फोटो डिलिट केले. सीसीटीव्हीमधील आरोपीचा फोटो दाखविल्यावर फिर्यादी यांना तो माहिती असतानाही त्यांनी त्याला ओळखत नसल्याचे सांगितले. परिणामी अंदाजे ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना तपासाचे वेगवेगळ्या पथकामध्ये समाविष्ट करुन शहरातील २५० ठिकाचे सीसीटीव्ही तपासणी करुन पोलिसांचे तांत्रिक तपासानंतर मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या व्यक्तीचा शोध पोलिसांनी लावला. या महिलेने केलेले गैरकृत्य हे तिने हेतुपुरस्सर व जाणिवपूर्वक केल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले.
त्यामुळे कोंढवा पोलिसांनी खोटी माहिती देणे, खोटे पुरावे तयार करणे, त्याचा वापर करुन पोलिसांना अधिकाराचा गैरवापर करण्यास प्रवृत्त करणे अशा (भारतीय न्याय संहिता कलम २१२, २१७, २२८, २२९) प्रमाणे अदखपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. याबाबत न्यायालयाच्या परवानगीने पुढील तपास करण्यात येणार आहे.
पोलिसांची दिशाभूल करुन खोटी माहिती दिल्याप्रकरणी या तरुणीविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.