Pune Crime News | व्हायरल व्हिडिओवरुन रेकॉर्डवरील गुंडांनी कोंढव्यात तोडफोड करुन दहशत माजविल्याचे उघड ! ‘हम इधरके भाई लोग है, मोक्का जैसे गुन्हे से बाहेर आयले है’ म्हणणार्या गुंडांवर 17 दिवसांनी गुन्हा दाखल, दोन गुंडे गजाआड
पुणे : Pune Crime News | कोंढव्यातील रेकॉर्डवरील गुंडांनी कोंढव्यातील शेरखान चाळ येथे जाऊन दगडाने सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. “हम इधरके भाई लोग है, मोक्का जैसे गुन्हे से बाहेर आएले है,” असे म्हणून त्यांनी परिसरात दहशत माजविली. परंतु, त्यांच्या दहशतीमुळे कोणीही पोलिसांकडे तक्रार केली नाही. तब्बल १७ दिवसांनी सोशल मीडिया व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे दहशतीचा हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहचला. पोलिसांनी १२ ते १५ जणांवर गुन्हा दाखल करुन दोघा गुंडांना अटक केली आहे.
सोहेल नवाज शेख ऊर्फ पठाण Sohail Nawaz Shaikh alias Pathan (वय २५, रा. अश्रफनगर, कोंढवा) आणि सादीक शेख (वय १९, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. त्यांचे साथीदार आदम, जोजो, अली, खड्डा, भंगार आणि त्यांचे आणखी ५ ते ८ अशांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार सुरज प्रभाकर शुक्ला यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शेरखान चाळ येथे घडली होती.
सोहेल शेख व त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न, खंडणीची मागणी करुन मारहाण केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मागील ५ वर्षात त्याच्याविरुद्ध १० गंभीर गुन्हे दाखल असल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन त्याला अमरावती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोंढवा पोलीस ठाण्यात असताना १२ जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला दिसून आला. त्यामध्ये कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार सोहेल शेख हा हातामध्ये हत्यार घेऊन १२ ते १५ मित्रांसह मिळून दुचाकीवरुन येऊन लोकांना शिवीगाळ करुन हातातील हत्यार फिरवून दहशत निर्माण करीत आहे, असा व्हिडिओ पाहिल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी हा व्हिडिओ कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे का याचा तपास करण्याचा आदेश दिला. त्यानुसार फिर्यादी सुरज शुक्ला, पोलीस अंमलदार संतोष बनसुडे हे परिसरात फिरुन व्हिडिओबाबत खात्री करीत असताना हा शेरखान चाळ येथील असल्याची माहिती मिळाली. त्या परिसरातील लोकांकडे विचारपूस करुन खात्री केली असता २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता घडल्याचे लोकांनी सांगितले.
सोहेल शेख, सादीक शेख, आदम, जोजो, अली, खड्डा, भंगार व आणखी ५ ते ८ जण दुचाकी गाड्यांवरुन आले. परिसरात लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे तोडण्याकरीता सांगत होते. त्याच्या साथीदारांनी कॅमेर्याच्या दिशेने दगड मारुन ते फोडण्याचा प्रयतन करीत होते. लोकांनी त्यांना तसे न करण्यास सांगितले असता त्यांनी लोकांना शिवीगाळी करुन हातातील हत्यारे हवेत फिरवून लोकांना हत्यार दाखवून ‘‘हम इधर के भाई लोग है, मोक्का जैसे गुन्हे से बाहेर आएले है, अभी हफ्ता भर पहले ३०७ जैसे गुन्हेसे बाहर आएले है, अगर कोई बिच मै आया तो मर्डर करेंगे,’’ असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकाराने परिसरातील लोक घाबरुन तेथून पळून गेले.
परिसरातील लोकांना पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देण्यास सांगितले, तेव्हा लोकांनी ‘‘वो लोग ईधर के भाई है, यहा इनकी दहशत है, हमने तक्रार की तो बाद मे मारेंगे, हमे उनकी तक्रार नही करने की है,’’ असे म्हणून लोकांनी तक्रार करण्यास नकार दिला.
त्यानंतर पोलिसांच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून दोघा गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.
