Pune Crime News | भांडणातून सोसायटीतील वाहने पेटवून देणार्या तरुणाला विश्रांतवाडी पोलिसांनी केली अटक, 6 दुचाकीसह विद्युत केबलचे नुकसान
पुणे : Pune Crime News | एकाबरोबर भांडणाच्या कारणावरुन पहाटेच्या सुमारास सोसायटीत येऊन पार्किंगमधील वाहने पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आग लावणार्या तरुणाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
विशाल राजेश खलसे Vishal Rajesh Khalse (वय १९, रा. परांडेनगर, धानोरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत राकेश शिवशंकर विश्वकर्मा (वय २६, रा. प्रियांश अपार्टमेंट, परांडेनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना धानोरीतील परांडेनगर येथील प्रियांश अपार्टमेंट येथे १३ मार्च रोजी पहाटे ४ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल खलसे हा काही कामधंदा करत नाही. त्याची राकेश विश्वकर्मा याच्याबरोबर १२ मार्च रोजी सायंकाळी किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. त्यानंतर खलसे हा प्रियांश अपार्टमेंटच्या आवारात १३ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास आला. त्याने सोसायटीतील तळमजल्यावर लावलेल्या वाहनांना आग लावली. आगीत सहा वाहनांचे नुकसान झाले, तसेच सोसायटीतील तळमजल्यावर असलेल्या वीज वाहिनीला आगीची झळ पोहोचली. सोसायटीच्या आवारातील वस्तू आगीत जळाल्या. आगीच्या घटनेची रहिवाशांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले.
फिर्यादी यांनी विशाल खलसे याने वाहनांना आग लावताना पाहिल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी विशाल खलसे याला अटक केली. परंतु, आपण आग लावली नसल्याचे विशाल खलसे याचे म्हणणे आहे. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करत आहेत.
