Pune Crime News | तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण करुन लुटणार्या सराईत गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | मोटारसायकलवरुन जाणार्या तरुणाला अडवून त्याला मारहाण करुन त्याच्याकडील रोकड, मोबाईल जबरदस्तीने लुटणार्या सराईत गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
अजय उकिरडे (वय २४, रा. रामटेकडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा साथीदार प्रेम थोरात (रा़ रामटेकडी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रशांत नामदेव कांबळे (वय २५, रा. आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रामटेकडी येथील पिवळा चौकजवळ ७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय उकिरडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
प्रशांत कांबळे हे मोटारसायकलवरुन घरी जात होते. त्यावेळी पिवळा चौकाजवळ अजय उकिरडे व प्रेम थोरात यांनी त्यांना अडविले. हाताने मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम असा १० हजार ४०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन ते पळून गेले. कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने शोध घेऊन अजय उकिरडे याला पकडले. प्रेम थोरात याचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करीत आहेत.
