Pune Crime News | ‘आम्ही पाषाणचे बाप, तुला मारुन टाकतो’; टोळक्याने रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या डोक्यात हत्याराने वार करुन केले गंभीर जखमी
पुणे : Pune Crime News | रिअल इस्टेट व्यावसायिक मित्रांबरोबर मध्यरात्री गप्पा मारत बसले असताना तिघा जणांच्या टोळक्याने येऊन आम्ही पाषाणचे बाप आहोत, तुला मारुन टाकतो, असे म्हणून तरुणावर लोखंडी हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले.
याबाबत सौरभ धनंजय जाधव (वय २६, रा. जय भवानी निवास, जय भवानीनगर, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन
पोलिसांनी संस्कार दीपक निम्हण Sanskar Deepak Nimhan (वय १९, रा. सिल्वर मुन सोसायटी, बावधन), संग्राम राहुल ढमाले Sangram Rahul Dhamale (वय २०, रा. बाणेर गावठाण, बाणेर), अमर चौधरी (वय १९, रा. पाषाण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पाषाण गावातील विठ्ठलनगर येथे १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ जाधव यांचा मिनाक्षी इंटरप्रायझेस नावाने रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. ते व त्यांचा मित्र नागेश कांबळे हे विठ्ठलनगर येथील गणेश मंदिराशेजारी मध्यरात्री गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तिघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांना पाहून जोरजोरात शिवीगाळ करत त्यांच्याजवळून निघून गेले. पुढे जाऊन पुन्हा वळून जाधव यांच्याजवळ आले. त्यांच्यातील संस्कार निम्हण म्हणाला की, आम्ही पाषाणचे बाप आहे, आज तुला मारुन टाकतो, अशाी धमकी दिली. त्याने हातामधील लोखंडी हत्यार अंगावर उगारले.
तेव्हा जाधव जीव वाचविण्यासाठी खाली वाकले असता लोखंडी हत्यार त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजुस लागल्याने डोक्यातून रक्त येऊ लागले. हे पाहून संस्कार निम्हण व त्यांच्याबरोबरील मुले गाडीवर जोरात निघून गेले. पुढे जाऊन ते एका चारचाकीला धडकले. त्यामध्ये ते गाडीवरुन खाली पडले. ससून रुग्णालयात उपचार घेतल्यावर सौरभ जाधव यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार रेड्डी तपास करीत आहेत.
