Pune Crime News | मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेला, पानशेत धरणात पोहताना बुडून तरुणाचा मृत्यू

पुणे : Pune Crime News | पानशेत धरण परिसरात फिरायला गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मोहनीस विजय बोलाटे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो येरवडा परिसरातील रहिवासी होता.
अधिक माहितीनुसार, रविवारी (दि.६) सुट्टी असल्याने मोहनीस आपला भाऊ शुभम आणि इतर काही मित्रांसह पानशेत धरण परिसरात फिरायला गेला होता. यावेळी काहीजण पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उतरून पर्यटनाचा आनंद घेत होते. तर काहीजण धरणाच्या कडेला बसून गाणी ऐकत आणि गप्पा मारत होते. यावेळी मयत मोहनीस आणि त्याचा मित्र ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी पोहण्यासाठी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. दोघेही धरणात उतरून पोहण्याचा आंनद घेऊ लागले.
यावेळी अचानक मोहनीस दिसेनासा झाला. ही बाब ज्ञानेश्वरच्या लक्षात आल्यानंतर त्याने आरडाओरडा सुरू केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला. मोहनीस कुठेच दिसून आला नाही. मोहनीस पाण्यात बुडाल्याचे समजताच मोहनीसचा भाऊ शुभमसह मित्रांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने खोल पाण्यात मोहनीसचा शोध घेतला. दीड तासांच्या बचाव कार्यानंतर पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी तातडीने मोहनीसला वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.