Pune Crime News | गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची एक कोटी 44 लाखांची फसवणूक; सत्यम जोशी पळला दुबईला, अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पुणे : Pune Crime News | शासकीय ठेक्यात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील प्रमुख संशयित सत्यम जोशी हा एक वर्षांपूर्वी दुबईला पळून गेल्याचे सांगण्यात येते. त्याच्याविरुद्ध यापूर्वी सांगवी, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. (Cheating Fraud Case)
याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सत्यम जोशी, देविका सत्यम जोशी, राहुल एरंडवणे, हर्षल चौधरी, कुलदीप कदम, वैभव इंगवले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचे फर्ग्युसन रोडवर कार्यालय होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकीतील ओैंध रस्ता परिसरात राहायला आहेत. आरोपींची आणि फिर्यादी यांची ४ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्या वेळी आरोपींनी आमच्या कंपनीला शासकीय कामाचा ठेका मिळाला आहे. या कामात गुंतवणूक केल्यास दरमहा ६ ते १२ टक्के व्याज देण्यात येईल, अशी बतावणी केली. त्यानंतर आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपये घेतले. महिलेने पैसे गुंतविल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम परताव्यापोटी देण्यात आली. त्यानंतर महिलेला परतावा देण्यात आला नाही. परतावा न मिळाल्याने आरोपींकडे गुंतविलेली रक्कम परत मागितली. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता़ जवळपास एक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे़ पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले तपास करत आहेत.