Pune Crime News | लग्नाअगोदरच मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणुक करण्याच्या नावाखाली महिलेची 26 लाखांची फसवणुक

Pune Crime News | Woman cheated of Rs 26 lakhs in the name of investing in children's education before marriage

पुणे : Pune Crime News | मॅट्रोमोनिअल साईटवर ओळख होऊन लग्नाचे आमिष दाखवून लग्नाच्या अगोदरच मुलांचे शिक्षण आणि आर्थिक सुरक्षेच्या नावाखाली प्लॉटमध्ये गुंतवणुक करायला सांगून महिलेची तब्बल २६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत येरवडा येथील शास्त्रीनगरमधील एका ४३ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मोबाईल धारक व वापरकर्ते, विविध बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ जून १५ सप्टेंबर २०२५ दरम्यान घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी अनुरुप विवाह या मॅट्रोमोनिअल प्लॅटफॉर्मवर नाव नोंदविले होते. आरोपीने त्यांना फोन करुन त्यांना अनुरुप विवाह या प्लॅटफॉर्मवरुन तुमचा बायोडाटा, तसेच संपूर्ण माहिती, मोबाईल क्रमांक मिळाल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. आपले लग्न झाल्यानंतर आपण आपल्या मुलांच्या  शिक्षणाकरीता  तसेच फायनान्शिअल सिक्युरिटी करीता आपण पनवेलमध्ये प्लॉटमध्ये गुंतवणुक करुया असे सांगितले. 

त्यासाठी पैसे कमी पडत असल्याचे सांगून विनीता कांडे, प्रेम म्हात्रे हे त्यांचे नातेवाईक आहेत़ ते त्यांचे फायनान्स मॅनेज करतात, ते विश्वासु आहेत. असे सांगून विश्वास संपादन केला. प्लॉटमध्ये गुंतवणुक करण्याकरीता त्यांना त्याने दिलेल्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याद्वारे फिर्यादी यांची २६ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याचा तक्रार अर्ज फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात केला होता. त्यावरुन आता येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करीत आहेत.

You may have missed