Pune Crime News | स्पावर पोलिसांची धाड पडल्याचे समजल्यावर पळून जाताना पाईप तुटून खाली पडल्याने महिलेचा मृत्यु, मॅनेजर जखमी, विमाननगरमधील घटना
पुणे : Pune Crime News | विमाननगर येथील सिटी स्पेस बिल्डिंगमधील द रुट स्पा यावर पोलिसांनी धाड टाकल्याचे समजताच पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून पाईपाला धरुन पळून जात असताना पाईप तुटल्याने खाली पडून एका महिलेचा मृत्यु झाला. तर स्पा मॅनेजर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.
संगिता इंदल मुखिया (वय ३७, रा. बिहार) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. हुसेन शफिकुल रहमान शेख (वय २८, रा. येरवडा भाजी मार्केट) असे जखमी झालेल्या स्पा मॅनेजरचे नाव आहे. मॅनेजर याच्या पायाला जखम झाली आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार लालु सतु कर्हे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी स्पा मॅनेजर हुसेन शफिकुल रेहमान शेख (वय २८, रा. येरवडा), स्पा मालक बाबु, जागा भाड्याने देणारे नारायण पुंजाराम धारे (वय २६, रा. निमगाव गुरु, पो. सावंगी टेकाळे, बुलढाणा), जागा मालक भुतकर संतोष जयंत (वय ४९, रा. युक्तिका अपार्टमेंट, वीरभद्रनगर, बाणेर), स्पामध्ये काम करणारा मेहदाद ऊर्फ अकरबरअली आलम (वय २२, रा. खांदवेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील सिटी स्पे बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर द रुट स्पा हे स्पा सेंटर आहे. याठिकाणी थायलंड व इतर ठिकाणच्या तरुणींकडून मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करवुन घेतला असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी तपास पथकाला सांगून बनावट ग्राहक तयार करुन त्यांना पाठविले. या ग्राहकाने पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना कॉल करुन इशारा दिला. त्याबरोबर पोलिसांनी सिटी स्पेस बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील द रुट स्पा वर छापा टाकला.
दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी काऊंटरवर कोणी दिसून आले नाही. काऊंटरच्या बाजुला असलेल्या रुम बंद असल्याने पोलिसांना संशय आला. दरवाजा कोणी उघडला नसल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला व आत प्रवेश केला. आतमध्ये एक मुलगी मिळुन आली. त्यावेळी तिने रुमच्या गॅलरीमधून मॅनेजर हुसेन शेख व संगिता मुखिया हिने खाली उडी मारल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी गॅलरीत जाऊन पाहिल्यावर खाली एक मुलगी व मुलगा जखमी अवस्थेत असल्याचे दिसले. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात पाठविले. उपचार सुरु असताना महिलेचा मृत्यु झाला. मॅनेजरवर उपचार करण्यात येत आहेत.
येथे ५ तरुणींकडून मसाजच्या नावाखाली ग्राहकांस खुश करुन वेश्या व्यवसाय करुन जास्त पैसे मिळतात, असे सांगून स्पा मालक बाबु हा त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेत होता. तेथून १६ हजार ५५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. येथे थायलंड, आसाम, हरियाना येथील ५ जणांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव तपास करीत आहेत.
