Pune Crime News | हृदयशस्त्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याने महिलेचा मृत्यु; प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. रणजित जगताप यांच्यासह सहकार्यांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | महिलेच्या हृदयरोग शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा केल्याने तिला संसर्ग होऊन त्यात तिचा मृत्यु झाला. ससून रुग्णालयाच्या समितीच्या अहवालानंतर वानवडी पोलिसांनी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. रणजित जगताप (Dr Ranjeet Jagtap) व त्यांच्या सहकार्यांवर निष्काळजीपणामुळे मृत्यु झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. रणजित जगताप व त्यांचे शस्त्रक्रिया करणारे सहकारी (राममंगल हॉस्पिटल, फातिमानगर, वानवडी) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. लिलावती मधुकर जायभाये (वय ६२) यांचा १९ नोव्हेंबर २०२५ रोजी राममंगल हॉस्पिटलमध्ये मृत्यु झाला होता. त्यावेळी त्यांच्या मुलाने तक्रार केल्याने ससून रुग्णालयाकडे माहिती पाठविण्यात आली होती. त्यानंतर तब्बल एक वर्षाने ससून रुग्णालयाच्या समितीने आपला अहवाल दिला आहे. याबाबत विजय मधुकर जायभाये (वय ४४, रा. बुलढाणा) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई लिलावती जायभाये यांच्यावर राममंगल हॉस्पिटलमध्ये डॉ. रणजित जगताप यांनी १९ ऑक्टोंबर २०२४ रोजी ह्दयशस्त्रक्रिया केली होती. शस्त्रेक्रियेनंतर लिलावती जायभाये यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर लिलावती यांना निमोनिया झाल्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांचा १९ नोव्हेंबर २०२४ रोजी मृत्यु झाला होता.
डॉ. रणजित जगताप यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या आईचा मृत्यु झाल्याचा आरोप विजय जायभाये यांनी केला होता. त्यामुळे पोलिसांनी राममंगल हॉस्पिटलमधील उपचारासंबंधीत सर्व कागदपत्रे जप्त करुन ती ससून रुग्णालयात पाठवून त्यांचा अभिप्राय मागितला होता. ससून रुग्णालयाने त्यावर समिती स्थापन करुन चौकशी करायला मोठा विलंब लावला. या समितीने चौकशी करुन आता १३ महिन्यांनंतर आपला अहवाल दिला आहे. त्यात डॉ. रणजित जगताप व त्यांच्या सहकार्यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याने लिलावती जायभाये यांचा मृत्यु झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर वानवडी पोलिसांनी निष्काळजीपणे मृत्यु झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), ३(५) नुसार दोषी आढळल्यास ७ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यात वैद्यकीय व्यावसायिकांनी निष्काळजीपणामुळे मृत्यु घडवल्यास २ वर्षांपर्यंतच्या तुरुंगावासाची शिक्षा व दंडाची शिक्षा दर्शविण्यात आली आहे.
