Pune Crime News | महिलेचे अपहरण करुन खंडणी घेऊन तिला तासभर शहरात फिरणारे सापडले वाहतूक कोंडीत, सहकारनगर पोलिसांनी केली दोघांना अटक

pune-police-arrest

पुणे : Pune Crime News | एरवी रस्त्यावरुन जाणार्‍या मिरवणुकांमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे असंख्य वाहनचालक त्रस्त होतात. पण, या वाहतूक कोंडीमुळे महिलेला धमकावून तिचे अपहरण करणारे व तिच्याकडून खंडणी उकळून विनयभंग करणारे दोघा अपहरण कर्त्यांना सहकारनगर पोलिसांनी पकडले. या महिलेची सुटका केली. (Sahakar Nagar Police)

महेश मोहन रासकर (वय २७) आणि किरण भाऊसाहेब ढगे (वय २७, दोघे रा. माळीमळा रोड, तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ३९ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेसात वाजेदरम्यान वडगाव धायरी, कात्रज ते पुणे सातारा रोडवर घडली. (Kidnapping Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता आपल्या बीड या मुळ गावावरुन वाघोली येथे आल्या. तेथून त्या कॅबने वडगाव धायरी येथे आल्या. कॅब सोडल्यानंतर त्या सोसायटीच्या गेटवर आल्या असताना पाठीमागून कारमधून आलेल्या दोघांनी त्याचे कारमध्ये जबरदस्तीने अपहरण केले. त्यांना अंगाला हात लावून त्यांचा विनयभंग केला. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गपचूप गाडीत बसण्यास सांगितले. त्यांना कारमध्ये घेऊन कात्रज येथे आणले. त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड विचारुन घेतला.

मोबाईलमधील फोन पे अकाऊंट चेक केले. तेव्हा त्यांच्याकडे केवळ १४०० रुपये असल्याचे दिसून आले. त्यांनी ते कात्रजमधील एका दुकानदाराला ट्रान्सफर केली. त्यांच्याकडून कॅश घेतली. त्यानंतर या महिलेला घेऊन ते शहरात येत होते. वाटेत रामनवमीनिमित्त मिरवणुका निघालेल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने त्यात त्यांची कार अडकली. ही संधी साधून या महिलेने सुटका करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रस्त्यावरील आजु बाजुच्या लोकांना लक्षात आला. सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे बंदोबस्तावर होते. त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन गाडीसह पोलीस ठाण्यात आणले. त्यातून हा अपहरण, विनयभंग आणि खंडणीचा प्रकार समोर आला. पोलिसांनी दोघांना अटक करुन अपहरणासाठी वापरलेली ४ लाखांची कार जप्त केली आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक फकीर, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, बजरंग पवार, सागर सुतकर, किरण कांबळे, योगेश ढोले, महेश भगत, अमित पदमाळे, बालाजी केंद्रे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, खंडु शिंदे यांनी केली आहे.

You may have missed