Pune Crime News | अनैतिक संबंध सोडत नसल्याच्या कारणावरून महिलेचा गळा आवळून खुन करुन मृतदेह टाकून दिला जंगलात, आंबेगाव पोलिसांनी प्रियकराला केली अटक

Pune Murder

पुणे : Pune Crime News | दोघेही एकमेकांचे नातेवाईक, दोघेही मूळचे नेपाळचे, दोघांचेही विवाह झालेले, त्यांना मुले बाळ झालेली, असे असताना त्यांचे अनैतिक संबंध होते. रखवालदार म्हणून काम करणार्‍याला आता हे अनैतिक संबंध नको होते, पण ती त्याला सोडायला तयार नव्हती. शेवटी त्याने टोकाचा निर्णय घेत तिला भिल्लारवाडीच्या जंगलात नेले. तिथे तिचा गळा आवळून खून केला. तब्बल १० दिवसांनी खुनाची घटना उघडकीस आली आहे.

मनिषा खम्म दमाई (वय २५, रा. आयुषी कॉम्लेक्स, पारे चौक, नर्‍हे) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत किशन भरत परिहार (वय २५, रा. ओम शांती बिल्डिंग, मानाजीनगर, नर्‍हे) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, रा. हिंजवडी, मुळ रा. ढकारी, गाड पालिका, जि. अछाम, नेपाळ) याला अटक केली आहे. ही घटना मुंबई बंगलोर महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याजवळील वाडा हॉटेलचे मागील बाजूला जंगलामध्ये १८ ते २८ मार्च २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश तिखात्री, मनिषा दमाई आणि किशन परिहार हे मुळचे नेपाळचे राहणारे असून गेल्या काही वर्षांपासून पुण्यात रहातात. खुन झालेली मनिषा दमाई ही किशन परिहार यांची बहिण आहे. तर तिघेही एकाच समाजातील आहे. प्रकाश तिखात्री व मनिषा दमाई यांचे विवाह झाले असून त्यांना मुलेही आहेत. त्यांचे अनैतिक संबंध होते. प्रकाश तिखात्री याला आता हे प्रेमसंबंध नको होते. परंतु, मनिषा हिला ते मान्य नव्हते. ती प्रेमसंबंध तोडण्यास नकार देत असल्याच्या रागातून १८ मार्च रोजी प्रकाश तिखात्री हा तिला घेऊन भिल्लारवाडी येथील जंगलात गेला. तेथे त्याने तिचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खुन केला.

मनिषा दमाई ही काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने तिचे नातेवाईक तिच्या मिसिंगची तक्रार देण्यास नर्‍हे पोलीस ठाण्यात गेले होते. हा प्रकार आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पोलिसांनी आंबेगाव पोलिसांकडे पाठविले. मनिषा हिच्या नातेवाईकांकडून आंबेगाव पोलीस माहिती घेत असताना प्रकाश तिखात्री याचे नाव समोर आले. पोलिसांनी प्रकाश तिखात्री याची आपल्या पद्धतीने चौकशी केली. तेव्हा त्याने तिचा गळा आवळून खुन केल्याची कबुली दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी यांनी मनिषा हिचे नातेवाईकासह आरोपीला घेऊन भिल्लारवाडीच्या जंगलात नेले. तेथे प्रकाश तिखात्री याने घटनास्थळ दाखविले. किशन परिहार याने मनिषा हिचा मृतदेह ओळखला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, वाघमारे आणि डोईफोडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. आंबेगाव पोलिसांनी प्रकाश तिखात्री याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी तपास करीत आहेत.

You may have missed