Pune Crime News | अवकाळी पावसामुळे विजेच्या धक्क्याने कारगीराचा मृत्यु, दोघा ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | शहराच्या काही भागात १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस आला. हा पाऊस एका कारागीरचा काळ ठरला. बालेवाडी येथील नियोजित गृहप्रकल्पाच्या परिसरात विजेचा धक्का बसुन एका कारागीराचा मृत्यु झाला. सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना न केल्याने बाणेर पोलिसांनी दोघा ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
उज्वल मजुमदार (वय ३२, रा. लोटस रिअॅलिटी, उमराणी हॉस्पिटलजवळ, बालेवाडी) असे मृत्यु पावलेल्या कारागीराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सरस्वती मजुमदार (वय २८) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बांधकाम करणार्या व्हॅलकन इन्फ्रा कंपनीचे Vulcan Infra Company प्रविण चंद्रकांत जवळकर Pravin Chandrakant Javalkar (रा. ब्लक बिल्डिंग, अॅलोरिंग स्काय, विधाते वस्ती, औंध बाणेर रोड) आणि महेंद्र केशव चांडगे Mahendra Keshav Chandge (रा. सहकारनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जल मजुमदार सुतारकाम करतो. बालेवाडीतील लोटस रिअॅलिटी या गृहप्रकल्पात कॉलम उभारण्यासाठी लागणारे प्लायवुड कापण्याचे काम उज्ज्वल करत होता. गृहप्रकल्पाच्या आवारात तो पत्नीसह राहायला आहे. १८ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास तो गृहप्रकल्पाच्या आवारात सुतारकाम करत होता. त्या वेळी अचानक पाऊस आला. त्यामुळे त्याने प्लायवूड कापण्याचे मशीन बंद करुन प्लायवूड कापणार्या कटरची वायर गोळा करत असताना त्या वायरचा विजेचा धक्का मजुमदार याला बसल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
उज्ज्वल मजुमदार यांना व्हॅलकन इन्फ्रा कंपनीने कामगाराच्या सुरक्षिततेसठी कोणतीही उपाय योजना न करता त्यांची व्यक्तीगत सुरक्षिता धोक्यात येईल, असे हयगयीचे व निष्काळजीपणाचे कृत्य केल्याने उज्वल याचा मृत्यु झाला़ दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदारां विरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.
