Pune Crime News | टेम्पोतील ब्रँडेड कपड्यांचे पार्सल चोरुन नेणार्या महिलेला येरवडा पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | रस्त्याच्या कडेला लावलेल्या टेम्पोमधून ब्रँडेड कपड्याचे पार्सल चोरुन नेणार्या महिलेला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. कपडे चोरणार्या या महिलेचा सीसीटीव्ही फुटेजवरुन माग काढण्यात आला.
नंदा विकास काळे Nanda Vikas Kale (वय ४५, रा. पाण्याच्या टाकीजवळ, चंद्रमानगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका टेम्पो चालकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेम्पो चालक हे ऑनलाइन पद्धतीने विक्री करणार्या विविध वस्तूंची वाहतूक करतात. महागडे कपडे पोहोचविण्याचे काम टेम्पो चालकाकडे सोपविण्यात आले होते. १८ नोव्हेंबर रोजी चालकाने टेम्पो येरवड्यातील प्रतीकनगर परिसरात लावला. टेम्पोत महागड्या कपड्यांचे पार्सल ठेवण्यात आले होते. काळे हिने टेम्पोत ठेवलेले कपड्यांचे पार्सल लांबविले. दुसर्या दिवशी टेम्पोतून पार्सल चोरीला गेल्याचे लक्षात आले. टेम्पो चालकाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे आणि शैलेश वाबळे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला टेम्पोजवळ जाऊन माल काढून घेऊन जाताना दिसून आली. ही महिला त्याच भागात रहात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी चंद्रमानगर परिसरात शोध घेऊन नंदा काळे हिला पकडले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार महेंद्र शिंदे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, नटराज सुतार, अतुल जाधव, अक्षय शिंदे, अमोल गायकवाड, संदीप जायभाय यांनी केली़
