Pune Crime News | जबरी चोरीसाठी घरात शिरणार्‍या आरोपींना येरवडा पोलिसांनी केले 24 तासात जेरबंद

Pune Crime News | Yerawada Police arrested the accused who entered the house for forced theft within 24 hours

बॉयफ्रेंडचे थकलेले घरभाडे भरण्यासाठी अल्पवयीन पुतणीने काकाच्या घरी जबरी चोरी करण्याचा रचला प्लॅन

पुणे : Pune Crime News | कल्याणीनगरमधील एका फ्लॅटमध्ये हत्यारांसह शिरुन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना येरवडा पोलिसांनी २४ तासात अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर फिर्यादीच्या घरातील अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंडचे भाडे थकल्याने पैसे मिळविण्यासाठी त्याच्या मित्रांचे मदतीने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

यश मोहन कुर्‍हाडे (वय २०, रा. केसनंद), वृषभ प्रदिप सिंग (वय २१, रा. चर्‍होली), प्राज विवेक भैरामडगीकर (वय १८, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत कल्याणीनगरमधील एका गृहिणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सव्वा चार वाजता घडला होता.

फिर्यादी या घरात बसलेल्या असताना तोंडावर मास्क व हुडी घातलेले दोघे जण आत आले. त्यांच्या हातामध्ये सुरी, सुतळी व टेप दिसल्यावर त्यांनी दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. तरीही ते दार ढकलून आत आल्यावर त्या बेडरुममध्ये जाऊन आरडाओरडा करु लागल्या. त्यांच्या जाऊला घरात चोर शिरल्याचे सांगितले. त्या ही आरडाओरडा करु लागल्या. लोक जमा होऊ लागल्याचे पाहून ते चोरटे पळून गेले.

येरवडा पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी सोसायटी मधील सीसीटीव्ही तपासले. त्यात एक जण मास्क लावून खाली थांबल्याचे व तिघे घराकडे मास्क व हेल्मेट घालून जाताना दिसले. काही वेळाने परत येताना दिसून आले. याबाबत चौकशी सुरु असताना त्यांच्या येथील एक अल्पवयीन मुलगी इतका मोठा प्रकार घडला असताना तेथून निघून जाऊ लागली़ तिच्याकडे चौकशी केल्यावर तिने तिचा बॉयफ्रेंड आल्याने जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड इकडे काय करतो, याची चौकशी केली. त्यातून हा सर्व उलगडा झाला.

फिर्यादी यांच्या पुतणीचा बॉयफ्रेंड आहे. त्याचे घरभाडे थकले होते. या मुलीने माझ्या काकांकडे पैसे आहेत. तुम्ही चोर म्हणून येऊन पैसे घेऊन जा असे सांगितले. परंतु, त्यानंतर महिनाभर काही झाले नाही. पुढील महिन्याचे भाडे थकले असल्याने त्यांनी जुना प्लॅन अंमलात आणण्याचे ठरविले.

काकाच्या घरी कधीही न जाणारी ही पुतणी त्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन बसली. तेथून तिने बॉयफ्रेंडला फोन केला. त्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडच्या मित्रांनी येऊन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, घरातील महिलेने आरडाओरडा केल्याने ते गोंधळून गेले व तेथून पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे पोलीस अंमलदार नटराज सुतार यांना माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तिघांना अटक केली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, विजय ठकार, पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पोलीस उप निरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार नटराज सुतार, संदीप जायभाय, गणेश पालवे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे यांनी केली आहे.

You may have missed