Pune Crime News | ‘‘तू दोस्तीच्या लायकीचा नाही’’, म्हणत चाकूने तरुणाच्या छातीवर वार करुन केला खुनाचा प्रयत्न, जनवाडीतील मध्यरात्रीची घटना, दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | डिलिव्हरी बॉयचे सुरु असलेले काम, त्यातून वेळ मिळत नाही़ त्यात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बालमित्राशी बोलणे कमी केले. त्याचा राग येऊन हा बालमित्र व त्याच्या साथीदाराने तरुणाला ‘‘तू छपरी आहे, तू दोस्तीच्या लायकीचा नाही’’ असे म्हणत त्याच्या छातीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
शिवा शिवशंकर कांबळे (वय २५, रा. ओम साई मंजू मित्र मंडळाजवळ, जनता वसाहत, जनवाडी) हा गंभीर जखमी झाला असून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शाम विटकर (आळंदी श्याम्या) (वय २५, रा. वडारवाडी) व त्याच्या साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जनवाडीतील जनता वसाहतीत १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा कांबळे हे ब्लिंकिट मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. शाम विटकर व तो बालपणीचे मित्र आहेत. त्यांची चांगली मैत्री होती. ५ वर्षापूर्वीपर्यंत ते नेहमी भेटत असे. शाम विटकर विरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून शिवा कांबळे याने त्याच्यासोबत बोलणे कमी केले. ब्लिंकीटमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम सुरु केल्यावर त्याच्या सोबत अजिबात संपर्क ठेवला नाही. तो खूप दिवसांपासून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता.
शिवा कांबळे १८ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता वडारवाडीतील मामाच्या घरी जेवण करण्यासाठी गेला होता. तेथून ते मध्यरात्री १२ वाजता दुचाकीवर घरी जात होते. वेताळ बाबा चौकात शाम विटकर व त्याचे दोन मित्र थांबले होते. त्यांनी शिवा कांबळे याला थांबविले. शाम विटकर याने तु माझ्यासोबत येत नाही, बोलत नाहीस, तेव्हा शिवा कांबळे याने मला वेळ नाही, मी घरी जातो, असे म्हणून ते गाडीवरुन घरी निघाले.
साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते घराजवळ गाडी पार्क करत असताना शाम विटकर व त्याचा मित्र त्याच्या पाठोपाठ आले. शाम विटकर कांबळे याला म्हणाला की, ‘‘ तू लई छपरी आहे, तु दोस्तीच्या लायकीचा नाही. माझा तू वापर करुन घेतला़’’ यावेळी त्याच्याबरोबर असलेला मित्र शामला म्हणाला, ‘‘मी याला मारु का’’ असे बोलून शाम व त्याने शिवा कांबळे यांना हाताने मारहाण केली. शामच्या मित्राने हातातील चाकूने छातीवर वार करुन गंभीर जखमी केले. चाकू हाताने पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्या हाताला जखम झाली त्यावेळी शाम विटकर याचा दुसरा मित्र इम्रान याने शिवा कांबळे याला दोघांच्या तावडीतून सोडवले व याला मारु नका, असे बोलू लागला. कांबळे यांच्या मित्रांनी व आईने त्यांना जखमी अवस्थेत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. या घटनेनंतर शाम विटकर व त्याचा मित्र पळून गेले असून सहायक पोलीस निरीक्षक भांडवलकर तपास करीत आहेत.
