Pune Crime News | तरुणाला अडवून मारहाण करुन भर दुपारी लुटले ! मामाच्या मदतीने तरुणाने तिघापैकी एका चोरट्याला पकडून केले पोलिसांच्या हवाली

पुणे : Pune Crime News | कामावरुन सुटल्यावर भर दुपारी फॉरेस्ट पार्क रोडवरुन जाणार्या तरुणाला अडवून तिघांनी मारहाण करुन त्यांच्या खिशातील रोकड जबरदस्तीने चोरले. या तरुणाला मारहाण करत असताना पाठीमागून आलेल्या मामाच्या मदतीने एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
संतोष किशन राठोड (वय २१, रा. सुदामनगर, धानोरी) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अतुल निवृत्ती पाटील (वय २१, रा. फॉरेस्ट पार्क रोड, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोहगावमधील एअर फोर्स संरक्षणभिंत लगत फॉरेस्ट पार्क रोडवर रविवारी दुपारी साडेचार वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल पाटील हे गुगल कंपनीमध्ये काम करतात. कामावरुन सुटल्यावर ते दुचाकीवर फॉरेस्ट पार्क रोडवरुन दुपारी साडेचार वाजता घरी जात होते. यावेळी दुचाकीवरुन तिघे जण आले. त्यांनी अतुल पाटील यांना अडवून चाकूचा धाक दाखवून खिशातील पाकिटामधील ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागले. त्याचवेळी त्यांचे मामा नंदकुमार खांदवे हे मुलांना शाळेतून घेऊन घरी जात होते. अतुल पाटील यांना मारहाण होत असल्याचे पाहून ते थांबले. त्यांनी का मारहाण करता, असे विचारले असता त्यांनाही मारहाण करण्यास त्यांनी सुरुवात केली. तेव्हा दोघांनी मिळून त्यांच्यातील एकाला पकडून ठेवले. अन्य दोघे पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे तपास करीत आहेत.