Pune Cyber Crime News | विघ्नेश्वर मल्टीस्टेट को-ऑप बँकेचा संचालकच सायबर गुन्हेगार ! 1 कोटी 60 लाखांची फसवणूक करणार्या जणांना 6 अटक, देशभरातील 29 गुन्ह्यातील पैसे मागविण्यासाठी बँकेतील खात्यांचा केला वापर

पुणे : Pune Cyber Crime News | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करुन जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणुक करणार्या ६ जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये वाघोली परिसरातील विघ्नेश्वर मल्टीस्टेट को – ऑप बँकेचा संचालकाचा समावेश आहे. तर दुसरा आरोपी रोहित कंबोज हा या बँकेत टेक्निकल काम करत आहेत. त्यांनी बँकेतील खात्यांचा पैसे मागविण्यासाठी वापर केल. तसेच आलेले पैसे काढून ते नवीन खात्यात टाकून त्याद्वारे युएसडीटी बनवून त्याद्वारे क्रिप्टो करन्सी खरेदीसाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. (Online Fraud Case)
गोविंद सूर्यवंशी (रा. वाघोली, मुळ रा. हिंगोली) रोहित कंबोज (रा. वाघोली, मुळ रा. पंजाब), ओमकार भवर (रा. वाघोली, मुळ रा. हिंगोली), जब्बरसिंह पुरोहित (रा. चर्होली, मुळ रा. धारावी, मुंबई) आणि केतन भिवरे (रा. खराडी), निखिल ऊर्फ किशोर सावत (रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Police News)
शेअर मार्केटमध्ये इन्व्हेंमेंटबाबत अनन्या गुप्ता या महिलेने संपर्क करुन वेगवेगळ्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये सामिल करुन घेऊन शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन चांगला परतावा मिळेल असे सांगून १ कोटी ६० लाख रुपये वेळोवेळी भरायला सांगून फसवणुक केली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पुण्यातील वाघोली येथील आयडीएफसी बँक खात्यात १७ मार्च २०२५ रोजी ५ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम चेकद्वारे काढल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हा क्षणाचा विलंब न लावता सायबर पोलिसांनी बँक खात्याचे खातेधारक केतन भिवरे याला ताब्यात घेतले. त्याचे बँक खाते व मोबाई क्रमांक याची तांत्रिक तपासणी केल्यावर त्यात गोविंद सूर्यवंशी, रोहित कंबोज, ओमकार भवर, जब्बरसिंह पुरोहित यांचा सहभाग असल्याचे दिसल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.
बँकेच्या संचालकाचा सहभाग
गोविंद सूर्यवंशी हा विघ्नेश्वर मल्टीस्टेट को -ऑप बँकेचा संचालक आहे. रोहित कंबोज हा बँकेच्या टेक्निकल कामात काम करत असल्याने त्याचा फायदा घेतला आहे. दोघे बी़ टेक उच्च शिक्षित असून त्यांच्या डिगीव्हेंटरी, वननेस, रजत सेल अशा डिजिटल मार्केटिंग नावाच्या कंपन्या आहेत. सूर्यवंशी व रोहित कंबोज हे दोघे क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारामध्ये सक्रिय असून त्यांनी त्याद्वारे अनेक युएसटीटी आरोपी जब्बरसिंह पुरोहित याला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच गुन्ह्यातील बँक खाते बनवुन त्याचा पुरवठा करणारा आरोपी निखिल ऊर्फ किशोर सातव यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
या ६ जणांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले़ न्यायालयाने त्यांची एकूण १२ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
देशभरातील २९ गुन्हे उघडकीस
या आरोपींनी सायबर गुन्हा करताना सुमारे १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केला असून नॅशनल सायबर पोर्टलवर त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या राज्यात एकूण २९ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पुणे सायबर पोलिसांनी भारतातील २९ गुन्हे आणण्यात यश मिळालेले आहे. आरोपींचे दुबई, गुजरात, पश्चिम बंगाल या ठिकाणी कनेक्शन असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदिप कदम, तुषार भोसले, पोलीस हवालदार चव्हाण, मुंढे, कोंडे, संदिप पवार, पोलीस अंमलदार दिनेश मरकड, यादव, नागटिळक, सचिन शिंदे, हवालदार जमदाडे, सोनुने, तसेच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मेमाणे यांनी केली आहे.