Pune Hit And Run Case | पुण्यात पुन्हा हिट अॅंड रन! भरधाव वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू, वाहन चालकाला अटक

पुणे : Pune Hit And Run Case | पुण्यात पुन्हा हिट अॅंड रनची पुनरावृत्ती झाली आहे. उंड्री परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (१ एप्रिल) सकाळी सातच्या सुमारास घडली. सुजितकुमार बसंत प्रसाद सिंह (वय ४९, रा. विद्यानिकेतन, हांडेवाडी रोड, उंड्री) असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. (Pune Accident News)
अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक पसार झाला. याप्रकरणी अर्चना सुजितकुमार सिंग यांनी फिर्याद दिली. त्यावरून काळेपडळ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. (Pune Crime News)
समोर आलेल्या माहितीनुसार, सुजितकुमार हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. ते हांडेवाडी रस्त्यावरील विद्यानिकेतन सोसायटीत राहत आहेत. ते मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असता, न्याती इबोनी सोसायटीच्या सुरक्षा भिंतीसमोरील मुख्य रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळले. या घटनेनंतर स्थानिकांनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यानंतर काळेपडळ पोलिस ठाण्याचे (Kalepadal Police Station) बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले.
सुजितकुमार सिंग यांच्या डोक्यातून आणि नाकातून रक्त येत असल्याने त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांना मृत्यू झाला. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हा ‘हिट अँड रन’चा प्रकार असल्याचे पुढे आले. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळावरून पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेऊन काळेपडळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. समीर गणेश कड (वय ३२, रा. गंगोत्री कॉम्प्लेक्स, होले वस्ती, उंड्री) असे या कारचालकाचे नाव आहे. त्याला सोरतापवाडी येथील दरडे गावातून ताब्यात घेण्यात आले आहे.
अपघात झाल्यानंतर कारचालक तेथे न थांबता पळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे वाहनचालकाचा शोध सुरु केला. पोलिसांना अपघात करणारी कार असून ती करड्या रंगाची असल्याची माहिती मिळाली. परंतु, तिचा नंबर प्लेटवरील पूर्ण क्रमांक दिसून येत नव्हता. काळेपडळ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून या कारचा नंबर मिळविला. समीर कड याचा शोध सुरु केला.
काळेपडळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अतुल पंधरकर यांना समीर कड हे त्यांच्या शेतातील घरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी पहाटे सोरतापवाडी येथील दरडे गावातील शेतामधील घरातून कड याला ताब्यात घेतले. आपण कार घेऊन जात असताना बाजूने डंपर आला होता. ते अचानक समोर आल्याने त्यांना धडक बसली. लोक मारहाण करतील, म्हणून घाबरुन तेथे न थांबता पळून गेल्याने समीर कड याने पोलिसांना सांगितले.