Pune Mayor Elections | राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी शीतल सावंत तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांचा उमेदवारी अर्ज दाखल (Video)
पुणे : Pune Mayor Elections | महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका शीतल सावंत तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. नुकतेच पक्षाचे सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले आहेत. याबाबत वरिष्ठांकडून आदेश येतील त्याप्रमाणे पुढील निर्णय घेण्यात येईल. सभागृहात अजित दादांच्या विकासाच्या मुद्द्यावर भूमिका घेण्यात येणार असून ‘ पुणेकर ‘ प्रथम ही आमची भूमिका राहील. पुणेकरांच्या हिताच्या विरोधातील निर्णयाला कडाडून विरोध करण्यात येईल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते ॲड. निलेश निकम यांनी स्पष्ट केली.
पुणे महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी ९ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ नगरसेवक आहेत. आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला शहर अध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, आमदार चेतन तुपे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमचे नेते अजितदादा पवार यांचे नुकतेच दुर्दैवी निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढवायची की नाही, यावर चर्चा झाली. अजित पवार यांचे निधन झाल्याने सर्व नेते दुःखात आहेत. त्यातच आज अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी दोन वाजेपर्यंत असल्याने वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यास वेळ मिळाला नाही. सावधगिरी म्हणून आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक ९ फेब्रुवारीला असल्याने येत्या दोन तीन दिवसांत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येईल. त्यांच्याकडून जो निर्णय घेण्यात येईल त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.
सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रमुख विरोधकाची भूमिका समर्थपणे बजावेल. नेहमी विकासाचा ध्यास घेऊन राजकारण करणारे दिवंगत नेते अजित पवार यांच्या आदर्श समोर ठेवूनच ‘ पुणेकर ‘ प्रथम या तत्वानेच भूमिका पक्षाची राहील. पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा तितक्याच उच्च प्रतीचा राहील , याकडे सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील कटाक्षाने लक्ष देण्यात येईल.
