Pune Nashik Highway Accident | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; चिंचवडच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू, दोन मुले जखमी

Pune Nashik Highway Accident | Terrible accident on Pune-Nashik highway; Three members of a Chinchwad family died, two children injured

पुणे : Pune Nashik Highway Accident | जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव) येथे पुणे-नाशिक महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात चिंचवड येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मुले जखमी झाली आहेत. या दुर्घटनेत आई-वडील आणि आजीचा मृत्यू झाल्याने दोन्ही मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मृतांमध्ये मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे (48), पत्नी आरती आंबेगावे (40) आणि आई लता तूपलोंढे (63) यांचा समावेश आहे. जखमी मुलगी मृणाल (16) आणि मुलगा प्रेम (20) यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

अपघात कसा झाला?

मल्लिकार्जुन आंबेगावे हे नाशिकहून कार्यक्रम आटोपून पिंपरी-चिंचवडकडे परतत होते. रात्री सुमारे 11 वाजता मंचरजवळील एकलहरे येथे त्यांच्या कारवरील ताबा सुटल्याने ती दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या खासगी बसवर धडकली.

धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्ण चक्काचूर झाला आणि ती बसखाली घुसली. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सर्वांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या प्रकरणी बसचालकाने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

You may have missed