Pune News | हडपसर येथील स.नं. 15 आणि स.नं. 16 या पाटबंधारे विभागाच्या आरक्षित जागेवर खाजगी विकसकाचे फलक ! आरक्षण शिफ्ट करण्यासाठी मोठा गैरव्यवहार – कॉंग्रेसचा आरोप
पुणे : Pune News | हडपसर येथील स.नं.१५ आणि स.नं.१६ या पाटबंधारे विभागाच्या आणि महापालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर खाजगी विकसकाने मालकी हक्क सांगितला आहे. यामागे विकसक, अधिकारी आणि काही माननियांचे साटेलोटे असून यासाठी आरक्षण हटविण्याचा घाटही घालण्यात आला आहे. यामुळे स्थानीक नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. आरक्षण बदलण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी कॉंग्रेसच्यावतीने आज महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
कॉंग्रेसचे स्थानीक पदाधिकारी प्रशांत आणि पल्लवी सुरसे यांनी कॉंग्रेस नेते माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आणि नंदकुमार आजोतीकर, सतीश शिंदे, मंगेश राउत यांच्यासह महापालिका आयुक्तांची भेट घेउन याबाबत निवेदन दिले. त्यामध्ये हडपसर मधील स.नं. १५ व १६ मध्ये मॅटर्निटी होमचे आरक्षण आहे. तर स.नं.१६ मध्ये धोबी घाट आणि उद्यानाचे आरक्षण आहे. या सर्व जागा पाटबंधारे विभागाच्या मालकिच्या आहेत. यापैकी स.नं.१६ मधील आरक्षणांची जागा महापालिकेने आर्थीक मोबदला देउन ताब्यात घेतली आहे. यापैकी उद्यानाच्या जागेवर शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्या नावाने उद्यानही उभारले आहे. या उद्यानाच्या आवारातच शहीद सौरभ फराटे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्तावही महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, स.नं. १५ मधील मॅटर्निटी होमची जागा ताब्यात घेण्यात तांत्रिक अडचण आल्याने महापालिका आणि पाटबंधारे विभागाची कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार या जागेची शासकीय मोजणी देखिल झाली आहे. परंतु नुकतेच उजव्या कॅनॉल शेजारील वर्षे पाटबंधारे खात्याच्या या जागेवर अचानकपणे पुण्यातील प्रसिद्ध खाजगी बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या मालकीचे फलक लावले आहेत. यानंतर एका माननीयांच्या मदतीने स.नं. १५ वरील मॅटर्निटी होमचे आरक्षण हेमंत करकरे उद्यानाच्या जागेवर शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे आर्थिक गैरव्यवहाराचे संकेत मिळत आहेत. या परिसरातील नागरिकांसाठी शहीद हेमंत करकरे उद्यान हे एकमेव उद्यान आहे. त्यावर मॅटर्निटी होम आणि धोबी घाटाचे आरक्षण विकसित झाल्यास नागरिकांना उद्यान राहाणार नाही. प्रशासनाने स.नं. १५ मधील आरक्षण शिफ्ट करू नये आणि या सर्व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिल्याचे प्रशांत सुरसे यांनी सांगितले.
