Pune Patrakar Pratishthan | पुणे प्रेस क्लबच्या उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Pune Patrakar Pratishthan | Will make every effort to establish Pune Press Club

नागपूर  : Pune Patrakar Pratishthan | पुणे पत्रकार प्रतिष्ठानला देण्यात आलेल्या जागेमध्ये सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सर्वोत्तम संकुल उभारण्यासाठी राज्य सरकारतर्फे संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्य सरकारने पुणे पत्रकार प्रतिष्ठानला सेनापती बापट रस्त्यावर आठ हजार चौरस फुटाची जागा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे. ही जागा प्रतिष्ठान कडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. राज्य सरकारने ही जागा दिल्याबद्दल पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे देखील आभार मानण्यात आले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड.  राहुल नार्वेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, प्रतिष्ठानचे कार्यवाह पांडुरंग सांडभोर, खजिनदार सुनीत भावे, विश्वस्त विठ्ठल जाधव, संघाचे सदस्य विजय चव्हाण, प्रशांत आहेर, वैभव सोनवणे, ज्ञानेश्वर चौतमल, योगेश बोरसे, दिलीप राणे आदी उपस्थित होते.

नागपूर अधिवेशनामध्ये पुण्यातील पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस म्हणाले, “नागपूर येथील प्रेस क्लबच्या इमारतींचा पुनर्विकास करत आहोत. त्याच धर्तीवर पुण्यामध्ये अतिशय सुसज्ज अत्याधुनिक इमारत उभा केली जाईल. त्याचा उपयोग पत्रकारांचे क्षमता वृद्धी, कौशल्य विकसन आणि मनोरंजनासाठी केला जाऊ शकतो.”

उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, बावनकुळे यांनीही या प्रकल्पासाठी मदत केली जाईल अशी आश्वासन दिले.

You may have missed