Pune Pimpri Crime Court News | मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी दोघांना २० हजार रुपयांच्या दंडासह कारागृहाची शिक्षा

पुणे : Pune Pimpri Crime Court News | मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने कारावासासह २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मोटार वाहन न्यायाधिकरणाचे न्या. ए.सी. बिराजदार यांनी हा आदेश दिला. दत्तात्रय सतीश टिपरे (वय-२६) आणि राम कुमार भारती (वय-४६) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.
टिपरे यास ४ दिवसांच्या कारावासासह २० हजार रुपये, तर भारती यास ३ दिवसांच्या कारावासासह २० हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोघांनाही १० दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास दोघे वेगवेगळ्या ठिकाणी मद्य पिऊन वाहन चालविताना पिंपरी वाहतूक पोलिसांना आढळून आले. त्यांची ब्रिथ ॲनालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता त्यांनी नियमांपेक्षा जास्त मद्य प्राशन केले होते. सहायक सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी दोघांनाही शिक्षा देण्याची मागणी केली होती.