Pune PMC Elections | पीएमपीची आर्थिक परिस्थिती पाहता मोफत पीएमपी व मेट्रो प्रवासाची अजित पवार यांची घोषणा फसवी
घटनेनुसार उपमुख्यमंत्री पदच अस्तित्वात नाही हा निर्णय मुख्यमंत्रीच घेऊ शकतात; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आरोप
पुणे : Pune PMC Elections | राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेले मोफत पीएमपी आणि मेट्रो प्रवासाच्या ‘ हमी ‘ ने भाजप चांगलीच घायाळ झाली आहे. तिजोरीत पैसे नसल्याचे कारण देत मुलींच्या मोफत शिक्षणाची फाईल सहा महिने अडवणारे अर्थ तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या तिजोरीची परिस्थिती माहिती न घेता दिलेली ‘ हमी ‘ फसवी आहे. मुळात अशी योजना करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो. उपमुख्यमंत्री पद घटनात्मक नाही असे म्हणत भाजप नेते उच्च व तंत्राशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
भाजप निवडणूक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या मोफत प्रवासाच्या आश्वासनामुळे भाजप ची कोंडी झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. पाटील म्हणाले, अजित पवार यांनी मनपा निवडणुकीसाठी हमीपत्र जाहीर केलं आहे. घोषणा पूर्ण करायच्या नसतात. हमी पत्र असल्याने पूर्ण करणे बंधनकारक.
यापूर्वी मोफत वीज देऊ असे पूर्वी जाहीर केले होते. नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणत निर्णय माघारी घेतला होता.
त्यांचा मोफत मेट्रो आणि पीएमपी प्रवासाचे आश्वासन हे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार नसल्याने दिले असावे. बिहार इलेक्शन मध्ये विरोधकांनी दिलेल्या घोषणेप्रमाणे आहे.
स्वतःच्याच दाव्याच्याच विरोधात पाटील यांनी ही एकट्या पवारांनी घोषणा करायची घटना नाही. पहिली कॅबिनेट नोट तयार करावी लागते. त्यावर मुख्यमंत्र्यांची सही घ्यावी लागते. मुख्यमंत्र्यांना अधिकार असतात. पुण्यातच काय सर्व राज्यात मोफत बससेवा द्यायला हवी. असे प्रेस कॉन्फरन्स मध्ये घोषणा करता येत नाही असे म्हणत पाटील गोंधळात पडल्याचे दिसून आले.
मुलींना फी माफ करायचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी तिजोरी खाली करताय का? मुलींच्या मोफत शिक्षणाची फाईल त्यांनी सहा महिने अर्थमंत्री अजित पवार यांनी अडवली होती. सध्या पीएमपी ची आर्थिक परिस्थिती देखील याहून वेगळी नाही, असा गौप्यस्फोट देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस ने जाहीरनाम्यात पाणी, वाहतूक, स्वच्छता, पर्यावरण अशा अनेक बाबतीत आश्वासने दिली आहेत. पुण्याचे पालकमंत्री असताना हे प्रश्न का सुटले नाहीत याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे असा खोचक टोला देखील पाटील यांनी अजित पवार यांना लगावला.
उपमुख्यमंत्री पद घटनेत नाही
मोफत पी एम पी आणि मेट्रो प्रवास हा घटनात्मकरित्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. अगोदर कॅबिनेट नोट तयार होते, व्यवहार्यता तपासून मुख्यमंत्री त्यावर अंतिम स्वाक्षरी करतात. कॅबिनेट मध्ये मान्यता मिळाल्यानंतर अंमलबजावणी होते. घटनेत उपमुख्यमंत्री हे पदच नाही. त्यामुळे अजित पवार यांनी केलेल्या घोषणेला काही अर्थ नाही, असे पाटील यावेळी म्हणाले.
