Pune PMC Elections – Bapu Nair | जन्मजात कोणीही गुन्हेगार नसतो. चुकीच्या वेळी चुकीचे पाऊल पडल्याने गुन्हेगारीमध्ये….; ‘गुन्हेगारीचा शिक्का पुसून समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचे आहे, मतदारांनी संधी द्यावी’ – बापू नायर
पुणे : Pune PMC Elections – Bapu Nair | जन्मजात कोणीही गुन्हेगार नसतो. चुकीच्या वेळी चुकीचे पाऊल पडल्याने गुन्हेगारीमध्ये अडकत गेलो. आता त्यातून बाहेर पडलो आहे. स्वत:वरील गुन्हेगारीचा शिक्का पुसून मुख्य प्रवाहात यायचे आहे. समाजासाठी काम करायचे आहे. आता संधी मिळाली आहे. मतदारांनी संधी दिली, तर त्याचे सोनेच काय हिरे माणके मोती करुन दाखवू शकतो. मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन प्रभाग क्रमांक ३९ ड मधील राष्ट्रवादी काँंग्रेस-आयपीआय खरात गटाचे उमेदवार बापू नायर यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ३९ ड अपर सुपर इंदिरानगर येथून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बापू नायर या एकेकाळी गुन्हेगारी टोळी प्रमुखाला उमेदवारी दिल्याने त्यांची सर्वत्र चर्चा सुरु झाली. पोलिसांच्या रेकॉर्डवर त्यांची टोळीप्रमुख म्हणून नोंद आहे. याविषयी बापू नायर यांच्याशी विचारले असता बापू नायर म्हणाले की, मला थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाही तर आयपीआय खरात गटाकडून तिकीट मिळाले आहे. लोक म्हणतात, गुन्हेगारी संपली पाहिजे. आमचेही हेच मत आहे. जर कोणी गुन्हेगारी सोडून मुख्य प्रवाहात येत असले तर त्याला टारगेट का केले जाते. त्याच्यावर मीडियातून चौफेर टिका का केली जात आहे. त्याला बकासूर, राक्षस अशी विशेषणे दिली जातात. मीही एका सामान्य कुटुंबातून आलो आहे. माझी आई अपंग शाळेत शिक्षिका होती. वडिल भाजी विक्रेते आहेत. शिक्षण घेत असताना आजूबाजूचे वातावरण, झोपडपट्टीचा परिसर यामुळे गुन्हेगारीत ओढला गेलो. दोन गणेश मंडळातील वादातून आमच्यावर गुन्हे दाखल झाले.
त्यामुळे चुकीच्या वेळी चुकीच्या प्रवाहात वाहत गेलो. त्यात अडकत अडकत इथंपर्यंत आलो आहे. पण आता आम्ही ठरवले आहे, आता कशात अडकायचे नाही, यातून बाहेर पडायचे ठरविले आहे. ५ वर्षे झाली, कोणताही गुन्हा नाही. आता मुख्य प्रवाहात राहायचे आहे. समाजकार्य करायचे आहे. पक्षाने संधी दिली आता लोकांनी संधी दिली पाहिजे.
आपल्याला मिळणार्या प्रतिसादाबाबत बापू नायर म्हणाले की, लोकांना उत्सुकता आहे. यापूर्वीचे लोकप्रतिनिधी हे लोकप्रतिनिधी न राहता ठेकेदार झाले आहेत. हा फरक लोकांच्या लक्षात आला आहे. नगरसेवक हे सेवक न राहता मालक बनले आहेत. राजेशाही राजवट सुरु आहे. लोकांच्या दैंनदिन प्रश्नांवर त्यांची टोलवाटोलवी सुरु आहे. इथले ठेकेदार त्यांचेच, डंपर त्यांचेच, पोकलेनही त्यांचेच अशी परिस्थिती आहे. या सर्वांना नागरिक वैतागले आहेत. त्यांना बदल हवा आहे.
आपल्या प्रभागातील समस्यांविषयी बापू नायर यांनी सांगितले की, अपर सुपर इंदिरानगर प्रभागात साफसफाई, कचरा, स्वच्छ पाणी पुरवठा या मुख्य समस्या आहेत. युपीएससी परिक्षेत यशस्वी झालेल्या तरुणांचा डेंग्युने मृत्यु होतो, ही आपल्या सर्वांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे झोपडपट्टीचा परिसर असलेल्या भागात स्वच्छता ही खुप मोठी समस्या आहे. येथील मुख्य नाला हा उघडा आहे. त्यामुळे परिसरात घाण पसरुन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या नाल्यास भिंत बांधणार आहोत. परिसरात सांडपाणी वाहिन्यांची (ड्रेनेज लाईन) मोठी समस्या आहे. अनेक लोकांच्या घरासमोरुन सांडपाणी वाहत असते. हे चित्र बदलायचे आहे. यापूर्वीचे लोकप्रतिनिधी या समस्या सोडविण्यात कमी पडले.
नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी सत्ताधारी असलेले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आम्हाला भक्कम पाठिंबा मिळणार आहे. विकास कामे करताना निधीची कमतरता पडणार नाही. नागरिकांची ही कामे करण्यासाठी संधी मिळणे आवश्यक आहे.
जन्मत: कोणी गुन्हेगार नसतो. परिस्थिती त्याला त्यामध्ये ढकलते. आता त्यातून बाहेर पडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निश्चय केला आहे. आमच्यावरील हा गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी आता जनतेने साथ देण्याची आवश्यकता आहे़, असे आवाहन बापू नायर यांनी केले आहे.
