Pune PMC Elections | चंद्रकांतदादा, पुणेकरांच्या सुखात मीठ का कालवताय?; राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांचा थेट सवाल (Video)
पुणे : Pune PMC Elections | चंद्रकांत पाटील स्वतः काहीही करत नाहीत आणि इतरांनाही काम करू देत नाहीत, असा थेट आरोप करत अमोल बालवडकर यांनी पुन्हा एकदा पाटलांवर जोरदार टीका केली आहे.
“चंद्रकांतदादा, तुम्ही पुणेकरांच्या सुखात मीठ का कालवताय?” असा सवाल उपस्थित करत बालवडकर म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणांवर अनावश्यक टीका केली जात आहे.
अजित पवार यांनी आपल्या जाहीरनाम्यात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी मेट्रो आणि बस सेवा मोफत करण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर चंद्रकांत पाटील यांनी टीका करत, “अशी घोषणा करण्याआधी मुख्यमंत्र्यांना विचारले होते का?” असा सवाल उपस्थित केला होता.
याला प्रत्युत्तर देताना अमोल बालवडकर म्हणाले की, “चंद्रकांत पाटील स्वतःही काही करत नाहीत आणि इतरांनाही काही करू देत नाहीत.” नागरिकांच्या हिताच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
