Pune PMC Elections | महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या पथकाकडून 69 लाख रुपयांची रोकड जप्त, कोट्यवधीची दारू हस्तगत

Pune PMC Elections | Election Commission team seizes Rs 69 lakh cash, liquor worth crores in municipal elections

पुणे : Pune PMC Elections | महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या पथकाने ६७ लाख रुपयांची रोकड जप्त केली. तसेच मतदान स्लिप वाटप, चांदीच्या वस्तूंचे वाटप आणि पैशांचे वाटप या बाबत १७ गुन्हे दाखल करून २ लाख ६ हजार ३५० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून व्यापक बंदोबस्त आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून शहरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन राबवण्यात आले आहे.

शहरात १४ पोलिस उपायुक्त, ३० सहाय्यक पोलिस आयुक्त, १६६ पोलिस निरीक्षक, ७२३ सहाय्यक पोलिस निरीक्षक, तसेच १२,५०० पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ३ हजार २५० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या चार तुकड्या बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत. शहरातील ८८ सेक्टर निश्चित करून संवेदनशील भागात विशेष दक्षता घेतली जात आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान १८ स्थिर, १५ फिरते व १५ व्हिडिओ सर्वेक्षण पथकांद्वारे सतत नजर ठेवण्यात येत असून या कारवाईत आतापर्यंत ६७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विविध प्रतिबंधात्मक कायद्यांखाली एकूण ३ हजार ४३९ कारवाया करण्यात आल्या आहेत.

दारूबंदी कायद्यान्वये १७९ गुन्हे दाखल करून १ कोटी २३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत एमडी, गांजा, चरस व नशेच्या गोळ्यांसह सुमारे २६ लाख ८४ हजार ७२९ रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

निवडणूक काळात १५ अग्निशस्त्रे, १५ काडतुसे व २९ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून ३ हजार २९४ परवाना धारकांची शस्त्रे तात्पुरती जमा करून घेण्यात आली आहेत. याशिवाय शहरात ३१३ अजामीनपात्र वॉरंट्स बजावण्यात आले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे निवडणूक प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत हिंसाचाराचा एकही प्रकार घडला नसल्याचे पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.