Pune PMC Elections | महिला बचत गटासह तरुणांसाठी रोजगारनिर्मितीला चालना मिळणार ! ‘रोजगारासाठी शिवसेना उद्योग भवन उभारणार’ – आबा बागुल
पुणे : Pune PMC Elections | महिला बचत गट व तरुणांसाठी रोजगारनिर्मितीसाठी पुण्यात शिवसेना उद्योग भवन उभारून बचतगटांसह तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल,अशी ग्वाही शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधील अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी दिली.
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमध्ये माजी उपमहापौर आबा बागुल यांना प्रचारात भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः अनेकांकडून पहिल्या निवडणुकीची आठवण काढताना आजही विश्वासाचं नातं कायम असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. सकाळी दुचाकी रॅली, पदयात्रा काढून मतदारांशी आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांनी संवाद साधला.
यावेळी माध्यमांशी बोलताना आबा बागुल म्हणाले की, महिला बचत गट व तरुणांच्या रोजगारासाठी ‘शिवसेना उद्योग भवन’ची निर्मिती केली जाणार आहे.ज्याद्वारे स्थानिक महिला बचत गट, तरुण उद्योजक व स्टार्टअपसाठी स्वतंत्र व्यासपीठ मिळणार आहे. उत्पादन, पॅकेजिंग, ब्रँडिंग व विक्रीसाठी आवश्यक सुविधा यासह कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. तसेच उद्योगस्नेही कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यशाळा,आयटी, सेवा क्षेत्र, लघुउद्योग, गृहउद्योगांसाठी विशेष प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ त्याचप्रमाणे कर्ज, अनुदान, प्रशिक्षण व बाजारपेठ जोडणीसाठी मार्गदर्शन केंद्र असणार आहे. ज्यातून आर्थिक स्वावलंबनाची भक्कम पायाभरणी होणार आहे. महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना रोजगार, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना हा उद्देश असल्याचे आबा बागुल म्हणाले.
