Pune PMC Elections | ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ सुरू करणार ! ‘तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार’ : बाप्पु मानकर
पुणे : Pune PMC Elections | आजवर २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांच्या तातडीच्या सेवेसाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ थेट त्यांच्या दारी जाऊन समस्या सोडवेल, अशी घोषणा राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केली. प्रभाग क्रमांक २५ मधील प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हा शब्द दिला.
प्रभाग २५ – शनिवार पेठ व महात्मा फुले मंडई परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना कोणतीही तातडीची समस्या उद्भवल्यास घरपोच सेवा देण्यासाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. हेल्पलाईन क्रमांकाद्वारे ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आदी समस्यांची माहिती कार्यालयाला दिल्यास, संबंधित परिसरात तातडीने भेट देऊन समस्या सोडविण्याचे काम सुरू केले जाईल. समस्या निराकरणास वेळ लागणार असल्यास, प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.
माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेचा हा पुढचा टप्पा असेल. नागरिक आम्हाला ‘सेवक’ म्हणून निवडून देणार आहेत, आणि त्याच भावनेतून त्यांची निस्वार्थ सेवा करण्याचा माझा पक्का निर्धार आहे, असे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले. ते सध्या घरोघरी नागरिकांशी संवादावर भर देत आहेत. २४ तास जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हजारो लोकांच्या समस्या सुटल्या आहेत, या नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे बाप्पु मानकर म्हणाले.
दरम्यान, बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे भाजपाचे अधिकृत उमेदवार घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.
