Pune PMC Elections | प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार सांगता सभा उत्साहात संपन्न; हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे आणि कांता नवनाथ खिलारे यांना नागरिकांचा वाढत पाठिंबा
पुणे : Pune PMC Elections | महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रचार सांगता सभा आज रोजी त्रिमूर्ती मित्र मंडळ, जयभवानीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर जनसमुदायाने फुलून गेला होता.
पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे आणि कांता नवनाथ खिलारे यांनी मागील १०–१२ दिवसांत जोशपूर्ण प्रचार करत प्रभागातील विविध भागांत घरोघरी पोहोचून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली.
सभेत हर्षवर्धन दीपक मानकर यांनी प्रभागाच्या विकासासाठी पक्षाची दिशा, आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा तसेच पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. मागील ७–८ वर्षांत प्रभागात झालेली विकासकामे, नागरिकांसाठी दिलेली तत्पर सेवा, मूलभूत गरजांची पूर्तता आणि समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची कार्यपद्धती त्यांनी अधोरेखित केली. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर म्हणाले, “पुणे शहराला पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख प्रशासन देण्यासाठी नागरिकांनी परिवर्तनाला साथ द्यावी.” प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार कटिबद्ध असून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच काम करणाऱ्या उमेदवारांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून संपूर्ण पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रचार सांगता सभेला पक्षाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, महिला, तरुण तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
