Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्र. 3 मधून ऐश्वर्या पठारे रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी; सुरेंद्र पठारेंची रणनीती ठरली निर्णायक
पुणे: Pune PMC Elections | महानगरपालिकेच्या निवडणुकीत वडगावशेरीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पक्षाने अवलंबलेला धक्कातंत्राचा डाव अखेर यशस्वी ठरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने रणनीतीत बदल करत ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांना उमेदवारी दिली होती आणि निकालाने त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. ऐश्वर्या पठारे यांनी तब्बल १५ हजारांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे या प्रभागातील भाजपच्या चारही उमेदवारांनी विजय मिळवला, त्यामुळे प्रभागावर भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.
सुरुवातीला या प्रभागातून सुरेंद्र पठारे स्वतः निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र स्थानिक सामाजिक समीकरणे, महिला मतदारांचा वाढता प्रभाव आणि भविष्यातील नेतृत्व घडवण्याच्या दृष्टीने त्यांनी ऐनवेळी निर्णय बदलला. निकाल पाहता हा निर्णय योग्य ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
विकासाचा स्पष्ट आराखडा, १०० दिवसांचा अॅक्शन प्लॅन
प्रचारादरम्यान ऐश्वर्या पठारे यांनी भावनिक आवाहनांपेक्षा विकासकामांचा ठोस आराखडा मांडला. लोहगाव आणि विमाननगर परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडी यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर मांडणी केली. पहिल्या १०० दिवसांत पूर्ण होणाऱ्या कामांचा अॅक्शन प्लॅन जाहीरनाम्यात मांडण्यात आला, ज्याला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा
महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत या निवडणुकीत महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा सादर करण्यात आला. सुरक्षितता, आरोग्य, रोजगार, स्वावलंबन आणि दैनंदिन सुविधा यावर दिलेला भर हा विजयाचा एक महत्त्वाचा घटक ठरला.
आयटी मतदारांशी थेट संवाद
लोहगाव–विमाननगर परिसरात आयटी क्षेत्रात कार्यरत उच्चशिक्षित मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. MIT मधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या ऐश्वर्या पठारे यांनी भारतासह परदेशातील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये काम केले आहे. या प्रत्यक्ष अनुभवामुळे आयटी कर्मचारी, व्यावसायिक आणि तरुण मतदारांशी त्यांचा थेट संवाद साधला गेला. आयटी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन अडचणी आणि नागरी समस्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
सुरेंद्र पठारेंची मजबूत पकड निर्णायक
या प्रभागात गावकी-भावकीवर आधारित स्थानिक राजकारणाचाही प्रभाव आहे. अनेक वर्षांचा जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांवर केलेले काम आणि संघटनात्मक ताकद यामुळे सुरेंद्र पठारे यांची या भागात मजबूत पकड आहे. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाजपने ऐश्वर्या पठारे यांना पुढे केल्याची चर्चा निवडणुकीपूर्वीच रंगली होती, जी निकालाने खरी ठरली.
एकूणच, स्पष्ट विकासदृष्टी, महिलांवर लक्ष केंद्रीत धोरण, आयटी मतदारांशी साधलेला संवाद आणि सुरेंद्र पठारेंची अचूक रणनीती या सर्व घटकांमुळे वडगावशेरीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपला एकतर्फी यश मिळाले असून, ऐश्वर्या पठारे यांचा हा विजय भविष्यातील स्थानिक राजकारणात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.
