Pune PMC Elections | पुणे: विकासाचा केंद्रबिंदू जनता असली पाहिजे; लोकसहभागातूनच खरा व शाश्वत विकास घडतो; सुरेंद्र पठारे यांचे मत
पुणे: Pune PMC Elections | खराडी वाघोली या प्रभाग क्रमांक ०४ मधील उमेदवारांनी आज सकाळी व संध्याकाळी विकास पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधला. सकाळच्या सत्रात राजाराम पाटील नगर येथून पदयात्रेची सुरुवात झाली. तुळजाभवानी नगर, आपले घर परिसरातून मार्गक्रमण करत ही पदयात्रा म्हाडा परिसरात पार पडली.
दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी खुळेवाडी येथून पदयात्रा सुरू झाली. श्रीरामनगर, श्री पार्क, पाराशर सोसायटी परिसरातून ही पदयात्रा मार्गक्रमण करत संपन्न झाली.
या पदयात्रेदरम्यान गट ड मधील भाजपा-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी नागरिकांशी संवाद साधत विकासाबाबतची संकल्पना नागरिकांच्या समोर मांडली. “लोकप्रतिनिधी, जनता व प्रशासन यांच्यात समन्वय साधूनच विकासाचा आराखडा यशस्वी होऊ शकतो. जनतेच्या गरजा, सूचना तसेच अपेक्षा लक्षात घेऊनच विकासाचे नियोजन केले जाईल. प्रत्यक्षात परिणाम देणारा विकास घडवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची नोंद घेण्यात आली. लोकसहभागातून तयार होणारा विकास आराखडा अधिक परिणामकारक ठरेल व त्यातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असा विश्वास यावेळी पठारे यांच्यासह शैलजीत जयवंत बनसोडे (अ गट), रत्नमाला संदीप सातव (ब गट), तृप्ती संतोष भरणे (क गट) यांनी व्यक्त केला.
पदयात्रेमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद घडून आला असून विकास प्रक्रियेत स्वतःचा सहभाग महत्त्वाचा असल्याची जाणीव नागरिकांमध्ये अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
