Pune PMC Elections | पुणे : प्रभाग 3 मध्ये सुरेंद्र पठारे यांचा मास्टरस्ट्रोक; ऐश्वर्या पठारे विजयाच्या उंबरठ्यावर

Pune PMC Elections | Pune: Surendra Pathare's masterstroke in Ward 3; Aishwarya Pathare on the verge of victory

पुणे: Pune PMC Elections |  महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने वडगावशेरीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये धक्कातंत्र अवलंबत केलेला निर्णय सध्या यशस्वी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीला या प्रभागातून सुरेंद्र पठारे निवडणूक लढवणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र ऐनवेळी रणनीतीत बदल करत भाजपने त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात सुरेंद्र पठारे ‘मास्टरमाईंड’ ठरल्याची चर्चा रंगली आहे.

लोहगाव–विमाननगर परिसराचा समावेश असलेल्या या प्रभागात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेला उच्चशिक्षित मतदारवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर गावकी–भावकीवर आधारित स्थानिक राजकारणाचाही प्रभाव येथे दिसून येतो. या संपूर्ण भागात सुरेंद्र पठारे यांची मजबूत पकड असून, अनेक वर्षांचा जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर केलेले काम यामुळे त्यांना भक्कम जनाधार मिळाला आहे. हाच आधार लक्षात घेऊन ऐश्वर्या पठारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

ऐश्वर्या पठारे या उच्चशिक्षित असून त्यांनी एमआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. भारतासह परदेशातील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. आयटी क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे प्रभागातील आयटी कर्मचारी, व्यावसायिक आणि तरुण मतदारांशी त्यांचा थेट संवाद साधला जात आहे. वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन तसेच आयटी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन अडचणी यांची त्यांना चांगली जाण आहे.

गेल्या काही वर्षांपासून सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या माध्यमातून ऐश्वर्या पठारे सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. तसेच ‘सखी महिला मंच’च्या माध्यमातून सात हजारांहून अधिक महिलांचे संघटन उभे केले आहे. महिला सक्षमीकरण, बचत गट आणि सामाजिक प्रश्नांवरील कामामुळे महिलावर्गातही त्यांचा चांगला जनाधार निर्माण झाला आहे.

या सर्व बाबींचा विचार करता प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपचा हा मास्टरस्ट्रोक ठरत असून, ऐश्वर्या पठारे यांची विजयाकडे वाटचाल अधिक भक्कम होत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

You may have missed