Pune PMC Elections | पुणे – प्रभाग क्रमांक 04 : खराडी अर्बन ट्रान्सफॉर्मेशन कॉनक्लेव्हमधून विकासाचा नवा विचार
पुणे : Pune PMC Elections | खराडी येथील मैफील्ड इस्टेट येथे शनिवारी (ता. १०) भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या वतीने खराडी अर्बन ट्रान्सफॉर्मेशन कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खराडीतील विविध सोसायट्यांमधील नागरिक उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ०४ च्या विकासासाठी मांडण्यात आलेल्या नव्या विचारांची व दृष्टीकोनाची सर्वत्रच सकारात्मक चर्चा पाहायला मिळत आहे.
लोकसहभागातून विकासाची दिशा ठरवण्याच्या उद्देशाने आयोजित या कॉनक्लेव्हमध्ये सुरेंद्र पठारे यांनी मांडलेली विकास संकल्पना नागरिकांमध्ये विशेष कुतूहल आणि सकारात्मक संवादाचा विषय बनली आहे.
या कार्यक्रमात खराडीसह वाघोली परिसरासाठी पुढील काही वर्षांचा स्पष्ट व नियोजनबद्ध विकास आराखडा नागरिकांसमोर ठेवण्यात आला. वाहतूक व पार्किंग व्यवस्थापन, पाणीपुरवठा, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिलांसाठी सोयी, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र जागा, हरित क्षेत्रांचे संवर्धन तसेच डिजिटल माध्यमातून तक्रार निवारण यंत्रणा अशा अनेक मुद्द्यांवर सखोल आणि व्यवहार्य मांडणी करण्यात आली.
यावेळी बोलताना सुरेंद्र पठारे म्हणाले, “विकास म्हणजे नागरिकांचे रोजचे जीवन अधिक सोपे, सुरक्षित बनवणे हे खरे उद्दिष्ट असायला हवे. म्हणूनच विकासाचा आराखडा लोकांशी थेट संवाद साधून, त्यांच्या अनुभवांवर आधारित असला पाहिजे. खराडी-वाघोलीचा विकास लोकांच्या सहभागातूनच घडेल, हीच आमची भूमिका आहे.”
उपस्थितांनी यावेळी ट्रॅफिक, पार्किंग, स्वच्छता, सुरक्षा याबाबत विविध सूचना मांडल्या. या सूचनांचा समावेश करूनच अंतिम विकास आराखडा अधिक मजबूत केला जाईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
या संपूर्ण संकल्पनेत पारंपरिक राजकीय भाषेपेक्षा व्यवस्थापन, नियोजन आणि उत्तरदायित्वावर भर देण्यात आला असल्याने सुशिक्षित, आधुनिक आणि व्यावसायिक दृष्टी असलेले लोकप्रतिनिधी का आवश्यक आहेत, याचे हे उत्तम उदाहरण ठरत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
शैलजीत बनसोडे यांनी “नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या रस्ते, पाणी, स्वच्छता आणि सुरक्षितता या बाबी प्राधान्याने सोडवण्यावर आमचा भर असेल,” असे सांगितले. रत्नमाला सातव यांनी “महिलांसाठी सुरक्षित, सक्षम आणि सोयीस्कर नागरी सुविधा उभारणे हा विकासाचा महत्त्वाचा भाग असेल,” असे मत व्यक्त केले. तर तृप्ती भरणे यांनी “तरुण, विद्यार्थी आणि कुटुंबांसाठी सुविधा वाढवून खराडी-वाघोलीचा सामाजिक आणि सांस्कृतिक स्तर उंचावण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे नमूद केले.
भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमदेवारांनी एकत्रितपणे लोकाभिमुख, शाश्वत व भविष्यमुख विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता खराडी-वाघोली परिसरात विकासकेंद्रित तसेच विचारपूर्वक मांडलेल्या या नव्या मॉडेलला मोठा पाठिंबा मिळत आहे.
