Pune PMC Elections | एसआरए स्कीम राबवुन झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर मिळवून देणार; प्रभाग 13 चे उमेदवार विकारअहमद शेख यांचे व्हिजन

Pune PMC Elections | SRA scheme will be implemented to provide proper housing to slum dwellers; Vision of Ward 13 candidate Vikar Ahmed Sheikh

पुणे : Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन – जय जवान नगर या प्रभागातील ८० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहते. त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी आपण एसआरए स्कीम राबविण्यावर भर देणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून आवश्यकता लागेल, ती कामे करुन घेणार असल्याचे प्रतिपादन विकारअहमद मुख्तार शेख यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन – जयजवाननगर परिसरात विकारअहमद शेख हे विविध भागात दररोज पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधत आहेत. नागरिकांकडून त्यांचे प्रश्न जाणून घेत आहे. यावेळी त्यांना तुमचे प्रभागासाठीचे व्हिजन काय आहे, असे विचारता विकारअहमद शेख यांनी सांगितले की, प्रभाग १३ मध्ये ८० टक्के भाग हा झोपडपट्टीचा आहे. येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना चांगली घरे देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या परिसराच्या विकासासाठी सर्वप्रथम एसआरए स्कीम मोठ्या प्रमाणावर व वेगाने राबविण्याची आवश्यकता आहे. या योजनांची वेगाने अंमलबजावणी करण्यासाठी प्रसंगी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याशी प्रसंगी भांडुन काम करवुन घेण्यात येईल.

याचबरोबर या परिसरात शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे. मुलांना जर चांगले शिक्षण मिळाले तर त्यातून त्यांना चांगला रोजगार मिळविता येईल. व्यसनाधीनता कमी होईल. घरातील मुलगा, मुलगी यांना रोजगार मिळाला की, घरातील लोकांचे राहणीमान सुधारते. त्यादृष्टीने मुलांना चांगले शिक्षण मिळावे, रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. घर, शिक्षण, रोजगार याबरोबर परिसरात २४ तास पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन यावरही काम करुन प्रभात पुणे शहरात सर्वात स्वच्छ प्रभाग करवुन दाखविण्याचा मानस असल्याचे विकारअहमद शेख यांनी सांगितले.

मी व माझे वडिल मुख्तार शेख यांनी काँग्रेससाठी भरपूर काम केले. काँग्रेसमधील गटबाजीचा आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. जेव्हा संधी देण्याची वेळ येते, त्यावेळी त्यांनी कधीही अल्पसंख्याक समाजाला संधी दिली नाही. या उलट अजितदादा यांनी आम्हाला संधी दिली. शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनिल टिंगरे यांनी माझ्यासह आमच्या चौघांवर विश्वास दाखवून काम करण्याची संधी दिली. त्यांचा विश्वास आम्ही सार्थ ठरवून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवु, असे विकारअहमद मुख्तार शेख यांनी सांगितले.