Pune PMC Elections | पूर्व पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; भाजपचे कमळ फुलले, पक्षाची ताकद वाढली
पुणे : Pune PMC Elections | पूर्व पुण्याच्या राजकारणात यंदाच्या महापालिका निवडणुकीत मोठा उलटफेर घडला असून, सुरेंद्र पठारे यांनी आपली नेतृत्वक्षमता ठामपणे सिद्ध केली आहे. पारंपरिकरित्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वडगाव शेरी, वाघोली आणि येरवडा परिसरात यावेळी भाजपचे कमळ फुलले आहे. याचबरोबर पूर्व पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून सुरेंद्र पठारे यांनी केवळ विजय मिळवला नाही, तर दोन्ही पॅनल लीडने जिंकत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. या यशामागे त्यांची प्रभावी रणनीती, मजबूत संघटन कौशल्य आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क निर्णायक ठरला आहे. या विजयामुळे पूर्व पुण्यात भाजपची ताकदही लक्षणीयरीत्या वाढली आहे.
यंदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. नव्या चेहऱ्यांना संधी देत, तरुण पिढीला सोबत घेऊन पक्षविस्तारासाठी प्रयत्न सुरू होते. निवडणुकीपूर्वी सुरेंद्र पठारेंना भाजपमध्ये प्रवेश देऊन राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का देण्यात आला. त्याचवेळी भाजपने सुरेंद्र पठारेंवर विश्वास दाखवत प्रभाग क्रमांक ३ आणि ४ ची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली होती.
उच्च शिक्षित, उद्योजक आणि दूरदृष्टी असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी तळागाळापर्यंत पोहोचत मतदारांचा विश्वास संपादन केला. पूर्व पुण्याचा विकास मॉडेल प्रभावीपणे मांडत त्यांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी केवळ स्वीकारली नाही, तर ती यशस्वीपणे पार पाडत स्वतःसह पत्नी ऐश्वर्या पठारे यांचा संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आणला. त्यामुळे पठारे कुटुंबाचा राजकारणातील प्रवेश हा केवळ औपचारिक न राहता प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, पूर्व पुण्यात भाजपची ताकद मर्यादित मानली जात असताना सुरेंद्र पठारे यांनी मिळवलेले यश पक्षासाठी मैलाचा दगड ठरत आहे. या निकालामुळे केवळ स्थानिक राजकारणातच नव्हे, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीनेही भाजपच्या रणनीतीला नवे बळ मिळाले आहे.
राजकारणात नव्याने प्रवेश केलेल्या सुरेंद्र पठारे यांनी पहिल्याच परीक्षेत चमकदार कामगिरी करत “पूर्व पुण्याचा नवा धुरंदर” अशी ओळख निर्माण केली आहे. थेट मतदारांशी संवाद, स्थानिक प्रश्नांवर आधारित नियोजन, तसेच तरुण व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उभारलेली संघटनात्मक बांधणी हे त्यांच्या विजयाचे प्रमुख सूत्र ठरले, असे त्यांनी विजयानंतर सांगितले.
शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मध्ये सुरेंद्र पठारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रथमच एकूण आठ उमेदवार निवडून आणत ऐतिहासिक यश नोंदवले आहे.
